भ्रष्टाचारी सेवानिवृत्त अधिकाऱ्यासह पत्नी व मुलावर वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
New Bharat Times नेटवर्क
नांदेड : नांदेड महानगरपालिकेचे सेवानिवृत्त तत्कालीन अप्पर आयुक्त रामनारायन गगराणी यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या उघड चौकशीत २८ लाख ७२ हजाराची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाल्याने. त्यांच्यासह पत्नी व मुलाच्या विरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात गु.र.नं. 387/2022
कलम 13(1)(ई) सह 13 (2) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 आणि कलम 109 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नांदेड महानगरपालिकेत एकेकाळी आपल्या कामाचा दबदबा कायम ठेवून असलेले तत्कालीन अप्पर आयुक्त रामनारायन गगराणी नंतर मात्र वादग्रस्त ठरत गेले. त्यांच्या विरोधात त्यावेळी तक्रारीही झाल्या होत्या. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड कार्यालयाकडुन रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी वय ६२ वर्ष, व्यवसाय तत्कालीन अपर आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका, नांदेड सध्या सेवानिवृत्त रा. शारदानगर नांदेड यांचे मालमत्तेची उघड चौकशी करण्यात आली. सदर उघड चौकशीअंती रामनारायण गगराणी यांनी त्यांचे शासकीय सेवेतील दिनांक ०१/०३/२०१० ते ३०/०६/२०१६ या लोकसेवक पद धारण केलेल्या कालावधीत त्यांना कायदेशिररित्या प्राप्त असलेल्या आर्थिक उत्पन्नाच्या तुलनेत, त्यांचेकडे आढळुन आलेल्या अधिक मालमत्तेबाबत ते समाधानकारक स्पष्टीकरण देवु शकले नाहीत.
त्यांनी त्यांचे ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत २८ लक्ष ७२ हजार ६६० (ज्ञात उत्पन्नाचे तुलनेत ४५ % ) ची बेहिशोबी मालमत्ता संपादित केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरची मालमत्ता त्यांची पत्नी जयश्री रामनारायण गगराणी यांनी त्यांचे नावावर बाळगुन त्यांना अपप्रेरणा दिली. त्यांचा मुलगा प्रथमेश रामनारायण गगराणी यांनी सदर मालमत्ता ताब्यात बाळगुन त्यावर व्यवसाय करून गै.अ. रामनारायण गगराणी यांना प्रोत्साहन देवुन सहकार्य केले.
म्हणुन आरोपी लोकसेवक (१) श्री रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी, सद्या वय ६२ वर्ष, व्यवसाय तत्कालीन अपर आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका, नांदेड सध्या सेवानिवृत्त रा. शारदानगर नांदेड (२) सौ. जयश्री रामनारायण गगराणी, व्यवसाय गृहीणी / बुटीक, सद्या वय ५७ वर्ष रा. शारदा नगर नांदेड (३) श्री प्रथमेश रामनारायण गगराणी, सद्या वय ३४ वर्ष, व्यवसाय व्यापार, रा. शारदा नगर नांदेड यांचे विरूध्द उघड चौकशी करणारे चौकशी अधिकारी श्री राजेंद्र पाटील, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड यांचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन वजिराबाद, नांदेड येथे गुरनं ३८७ / २०२२ कलम १३ (१) (ई) सह १३ (२) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ व सह कलम १०९ भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सर्व आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास अशोक इप्पर पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड हे करीत आहेत.