लोहा तहसीलदार बनले माफीयांच्या ताटाखालचे मांजर : मारताळ्याच्या रेती माफीयांचा नायगावमध्ये उच्छाद

501

New Bharat Times नेटवर्क

नायगाव : लोहा तहसीलदार रेती माफीयांच्या ताटाखालचे मांजर बनले असल्याने मारताळ्याच्या रेती माफीयांनी नायगाव तालुक्यामध्ये प्रचंड उच्छाद मांडला आहे. महसूल विभागाने रात्रीला येणारी अवैध रेतीची वाहणे पकडण्याऐवजी ती सोडून देण्याचे धोरण अवलंबले असून. महसूल विभागाच्या लाचखोर धोरणामुळे नायगाव तालुक्यात जप्त करण्यात आलेल्या हजारो ब्रास रेतीची माती होत आहे. शासनाला अर्थिक चुना लावण्याच्या भुमिकेमुळे महसूल विभाग मोठ्या प्रमाणात बदनाम होत आहे.

नायगाव तालुक्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव झालेला नसतांना दररोज शहरासह ग्रामीण भागात असंख्य रेतीच्या हायवा येत असून नदीपात्रातून उपसा केलेली रेती विक्री करत आहेत. लोहा येथील तहसीलदार हे रेती माफीयांना पुरक भुमिका घेत असल्याने त्या भागातून रेतीचा अवैध उपसा सुरु आहे. लोहा तालुक्यातून चोरीच्या मार्गाने उपसा केलेल्या रेतीची रात्रीला अवैध वाहतूक करुन विक्री करण्यात येत आहे.

विशेषतः लोहा तालुक्यातून चोरीची रेती नायगाव तालुक्यात विक्री करणारे मारताळा येथे रेती माफीयांचे एक रँकेट असून येथील स्थानिक दलालांच्या माध्यमातून नायगाव शहरासह ग्रामीण भागात ग्राहक शोधून देत आहेत.

चोरीच्या रेतीची नायगाव तालुक्यात दररोज रात्री मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक करण्यात येत असतांना त्यांना अडवणारी किंवा कारवाई करणारी कुठलीच यंत्रणा सध्या कार्यरत नाही. कारण जिल्हाधिकारी कार्यालयाचे फिरते पथक व नायगाव तालुक्यासाठी गठीत करण्यात आलेले पथक फक्त कागदावरच आहे. नायगाव तहसीलदार व बिलोली उपविभागीय अधिकारी हे केवळ कारवाई करत असल्याचा देखावा करत असून. कारवाईच्या नावाखाली आपले उखळ पांढरे करत आहेत. विशेषतः बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी हे तर कुणाचा फोनच घेत नाहीत.

बाहेरच्या तालुक्यातील रेती माफीयांनी नायगाव तालुक्यात उच्छाद मांडला असताना येथील महसूल विभागाला काहीही सोयरसुतक नाही. कारण दलालांच्या माध्यमातून घरपोच व्यवस्था होत असल्याने सर्व काही अलबेल आहे. पण दोन वर्षांपूर्वी नायगाव तालुक्यात जवळपास ३० हजार ब्रास रेती जप्त करण्यात आली. यापैकी अद्यापही ५० टक्केच्या वर रेतीचा लिलाव झाला नाही.

कारण दररोज नदीपात्रातून काढलेली ताजी रेती मिळत असल्याने जप्त केलेल्या रेतीच्या लिलावाकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. अवैध रेती दररोज नायगाव शहरात येत असल्याने स्टाकची रेती कुणीच घ्यायला तयार नाही यामुळे शासनाचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे.

 

धाडसी कारवाई करण्यात अपयश…

नांदेड जिल्ह्यात रेतीच्या अवैध उपशामुळे मोठ्या प्रमाणात बदनामी झाली असल्याने नुतन जिल्हाधिकारी अभिजात राऊत हे कठोर पावले उचलतील असे वाटत होते मात्र त्यांनाही तराफे जाळण्याच्या पलीकडे काहीही कारवाई करत नसल्याने रेती माफीयांचे मनोधैर्य उंचावत चालले आहे.

अवैध वाहतूक होत नसल्याचा दावा…
रात्रीला रेतीची चोरी करुन अवैध वाहतूक करणाऱ्या वाहणावर दंडात्मक कारवाई करुन मालकावर फौजदारी गुन्हे नोंवण्याची गरज असताना केवळ अर्थिक तडजोडी करुन वाहणे सोडून देण्यात येत असून. याबाबत विचारणा केल्यास तालुक्यात अवैध रेती येतच नसल्याचा दावा महसूल विभागाकडून करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.