आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव यांना विंग्स ऑफ फायर पुरस्कार प्रदान

181

प्रकाश कांबळे

नांदेड : – दक्षिण भारतातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या जी स्क्वेअर व धीमन सोशल वेल्फेअर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा विंग्स ऑफ द फायर हा पुरस्कार देऊन आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव यांचा गौरव करण्यात आला.

हैदराबाद येथे एका शानदार नेत्र दीपक सोहळ्यात भाग्यश्री जाधव सह आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या दिव्यांग खेळाडूंचा देखील सन्मान करण्यात आला. एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

बी. साई प्रनेथ,जी स्क्वेअर चे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. ईश्वर,हैदराबादच्या उपमहापौर लता रेड्डी, पॅरालिंपिक क्रीडा असोसिएशनचे सचिव संजीव, सीआरपीएफचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल मिनास यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

जागतिक पातळीवर क्रीडा क्षेत्रातकारकीर्द गाजविणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी जी स्क्वेअर या दक्षिण भारतातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या समूहाच्या वतीने विंग्स ऑफ फायर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते यावर्षीच्या पुरस्कारासाठी देशभरातील निवडक खेळाडू बरोबरच नांदेडची भूमिकन्याभाग्यश्री जाधव यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

यावेळी बोलताना भाग्यश्री जाधव हिने पुरस्कार दिल्याबद्दल संयोजक समितीचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. या पुरस्कारामुळे आपल्याला अधिक प्रेरणा व उर्जा मिळालेली आहे. हा बहुमान माझ्या एकटीचा नसून हा महाराष्ट्र राज्याचा बहुमान आहे.

खेळाडूंना प्रोत्साहन देऊन आर्थिक पाठबळ देणाऱ्या संस्था संघटना बोटावर मोजण्या इतके आहेत. पण खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण करणारी मंडळी देखील पदोपदी दिसून येते. अशा अपप्रवृत्तीमुळे नमो हरम न होता मी प्रत्येक संकटावर मात करत वाटचाल करीत आहे. नांदेड जिल्ह्यातील जनतेबरोबरच महाराष्ट्रातील जनतेच्या सदिच्छा माझ्या पाठीशी आहेत. महाराष्ट्राचा व देशाचा नावलौकिक जागतिक स्तरावर होईल. यासाठी मी कसोशीने प्रयत्न करीत असल्याचे भाग्यश्री जाधव यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.