ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

माहूरच्या तहसीलदारांचे जात वैधता प्रमाणपत्र बनावट : तहसीलदार यादव यांना बडतर्फ करण्याची खैरवाड यांची मागणी

New Bharat Times नेटवर्क

नांदेड :- बनावटी जात वैधता प्रमाणपत्र सादर करून तहसीलदार पदावर नियुक्ती मिळविलेल्या माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांना बडतर्फ करा; अन्यथा आमरण उपोषण करू, असा इशारा माहितीचा अधिकार जनसेवा समितीचे अध्यक्ष एस.एस. खैरवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी आपले जात वैधता प्रमाणपत्र तत्कालीन औरंगाबाद विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. ३ कडून मिळविले आहे. वास्तविक पाहता औरंगाबाद विभागात विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या केवळ दोन आहेत. एक औरंगाबाद येथे तर दुसरी लातूर येथे आहे. केवळ दोन समित्या असतांना तहसीलदार किशोर यादव यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावर शासनाची जी मोहोर लावली आहे, त्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. ३ लातूर असा शिक्का आहे.

केवळ दोन समित्या असतांना तिसऱ्या समितीची शासकीय मोहोर आली कुठून ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. २ मध्ये लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. यादव यांच्या प्रमाणपत्रावर त्यांचे गाव, तालुका, जिल्हा लातूर असे दाखविण्यात आले असून, मारलेल्या शिक्क्यावर समिती क्र. ३ असा उल्लेख आहे. याचा अर्थ हे प्रमाणपत्र बनावट आहे.

त्यामुळे बनावटी कागदपत्रांच्या आधारे तहसीलदार पदाची खुर्ची बळकावणाऱ्या आणि शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या तहसीलदार किशोर यादव यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आपल्या मागणीचे निवेदन विशेष पोलीस महासंचालक नांदेड, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचेही खैरवाड यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker