नायगाव व बिलोली तालुक्यात विज पडून सात जनावरे मृत्यूमुखी

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : रविवारी सायंकाळी विजेच्या गडगडाटासह झालेल्या वादळी वारा व पावसात विज पडून मेळगाव येथे एक तर बळेगाव येथे बैलजोडी मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. त्याचबरोबर डोनगाव खु. येथेही विज पडून दोन गाई व दोन वासरे मृत्यूमुखी पडले आहेत.
मागच्या काही दिवसापासून उन्हाच्या चटक्याने नागरिक हैराण झाले होते. त्यातच हवामान विभागाने विजांच्या गडगडाटासह वादळी वारे व पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार तीन चार दिवसापासून सायंकाळच्या दरम्यान ढग भरुन येत होते आणि वारेह सुटत होते. मात्र विजेच्या गडगडाटासह पाऊस पडला नव्हता. रविवारी मात्र सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान नायगाव तालुक्यात विजेच्या गडगडाटासह वादळी वारे जोरदार पाऊस झाला. तब्बल दोन ते आडीच तास पाऊस सुरु होता.
नायगावसह बरबडा, नरसी, कुंटूर व मांजरम परिसरात विजेच्या गडगडाटासह वादळी वारा व जोरदार पाऊस झाला. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी तालुक्यातील मेळगाव येथील शेतकरी बालाजी गोविंदराव शिंदे एका बैलावर विज पडली तर बळेगाव येथील शेतकरी दिगांबर किशन पाटील बेलकर यांच्या शेताच्या आखाड्यावर असलेल्या दोन बैलावर विज पडली. या विज पडलेल्या दोन घटनेत तीन बैल मृत्यूमुखी पडले आहेत. या बेलकर यांची १ लाख २२ हजारची बैलजोडी होती. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे.
बिलोली तालुक्यातील डोनगाव खु. येथेही बालाजी सायन्ना कसलू यांच्या शेतातील झाडावर विज पडल्याने झाडाखाली उभे असलेल्या दोन गाई व दोन वासरे मृत्यूमुखी पडले असून बालाजी कसलू यांचा मुलगा थोड्या अंतरावर असल्याने बचावला आहे. सदरची घटना रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान घडली.