गंजगाव वाळू घाट प्रकरणी अगोदर दुर्लक्ष आता कारणे दाखवा नोटीस : बिलोली महसूल विभागाचा अजब कारभार

अंकुशकुमार देगावकर
बिलोली : तालुक्यातील गंजगाव येथील गट क्र. ३२५ वाळू निष्कासित करण्याच्या नावाखाली अटी शर्थीचा भंग करुन लागवडीयोग्य जमिनीवर ५ ते ७ हजार ब्रास रेतीचा अवैध साठा करण्यात येत असताना महसूल विभागाचे अधिकारी अगोदर दुर्लक्ष केले होते. या प्रकरणी तक्रार येताच शेत मालक सागरबाई बाजीराव पाटील यांनी बिलोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून चोवीस तासात खुलासा सादर करण्यात यावा अन्यथा नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

गंजगाव ता. बिलोली जि. नांदेड येथील गट क्र. ३२५ श्रीमती सागरवाई बाजीराव पाटील, यांच्या नावाने शासनाचा व मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्या आदेशाच्या शर्ती व अटी भंग करत रेती धक्का घेवून तेलंगानातील श्रीनिवास राव व गंगप्पा नामक व्यक्तीने गंजगाव येथील घरकूल साठी राखीव ठेवलेल्या गटातून व गट क्र. २८० मधील विरभद्र परबता कनशेटटे यांच्या गटालगत व गटात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात ८ पोकलेन मशीन व २ सक्शन पंपाद्वारे लागवडी योग्य जमीनीवर अवैधरित्या रेती साठवून ५ ते ७ हजार ब्रास रेतीसाठा केलेला असल्याने ते जप्त करुन जिल्ह्यातील घरकुलाच्या लाभधारकांना मोफत वाटप करण्यात यावा.
आणि शासनाची दिशाभूल करणा-या व परवान्यातील अटी शर्ती भंग करणाऱ्या ठेकेदारावर व त्यांच्यासोबत हातमिळवणी करुन शासनाची दिशाभूल करुन ठेका चालवणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ फौजदारी व दंडात्मक कार्यवाही करण्यासह धक्का बंद करण्यात यावा. अन्यथा लोकशाही मार्गाने दि.३० जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आत्मदहन करण्यात येईल. होणाऱ्या विलंबाची व परिणामाची सर्वस्वी जबाबदारी तहसिलदार, बिलोली व उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्यावर राहील अशी तक्रार राहुल जिगळेकर व शंकर तमनबोईनवाड दिली होती.
या तक्रारीत नमूद केल्यानुसार अवैध वाळूचे पिरॅमिड उभे करण्यात येत असताना महसूल विभागाच्या एकाही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. विशेष म्हणजे ज्या तलाठी मंडळ अधिकाऱ्यावर वाळू निष्कासित करण्यात येणाऱ्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असते ते काय करत होते असा प्रश्न निर्माण होतो. मात्र तक्रार येताच बिलोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी काल दि.२६ रोजी गंजगाव येथील गट क्र. ३२५ च्या परवाना धारक सागरबाई बाजीराव जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून सदरच्या नोटीसीत गंजगाव येथील खाजगी रेती घाटामधुन रेती उत्खनन करण्यासाठी आपणास परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानुसार आपणास ताबा देण्यात आलेला आहे. परंतु आपण आदेशात नमुद अटी व शतीचे पालन करित नाही असे माझ्या निर्देशनास येत आहे.
तक्रारी नुसार आपण तेलंगानातील श्रीनिवास राव व गंगप्पा नामक व्यक्तीच्या मदतीने गंजगाव येथील घरकूल साठी राखीव ठेवलेल्या गटातून व गट क्र. २८० विरभद्र परवता कनशेटटे यांच्या गटालगत व गटात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात ८ पोकलेन मशीन व २ सक्शन पंप द्वारे लागवडी योग्य जमीनीवर अवैधरित्या ५ ते ७ हजार ब्रास रेती साठा केलेला असल्याच नमुद केले आहे. जी गंभीर स्वरुपाची बाब आहे. आपण आपणास निश्चित करुन दिलेल्या जागेतून वाळूचे अवैध उत्खनन करून वाहतुक केल्याची या कार्यालयाची धारणा झाली असुन आपणाकडून दिलेल्या अटी व शर्ती चे उल्लघन झाल्याचे दिसुन येते.
तरी सदरील नोटीसीच्या अनुषंगाने आपला खुलासा नोटीस मिळाल्यापासुन 24 तासाच्या आत माझ्या समक्ष सादर करावे. आपला खुलासा प्राप्त न झाल्यास आपले काही म्हणले नाही असे गृहीत धरुन आपल्या विरुध्द नियमानुसार कार्यवाही करणेसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी नांदेड यांना सादर करण्यात येईल असा इशारा दिला आहे.