कांडाळ्याच्या महिला सरपंच अपात्र : मासिक सभा व ग्राम सभा न घेतल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : निवड झाल्यापासून कांडाळा ता. नायगाव येथील सरपंच बेबीताई नागोराव इरेवाड यांनी नियमानुसार ग्रामसभा व मासिक सभा घेण्यात कसूर केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरीत कालावधीसाठी अपात्र ठरवले आहे.
नायगाव तालुक्यातील कांडाळा येथील सरपंचाची निवड फेब्रुवारी २०२१ मध्ये झाली. तेव्हापासून सरपंच बेबीताई नागोराव इरेवाड यांनी सरपंच पदी निवड झाल्यापासून गावात विकासाच्या योजना व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतले नाही. ग्रामसभा व मासिक सभा हि ग्रामपंचायतीची दोन सभाग्रह असून मासिक सभेच्या माध्यमातून विविध योजना प्रभाविपणे अवलंब करणे हे सरपंच यांचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत १९५८ कलम ३६ नुसार सरपंच यांनी प्रत्येक महिण्याची मासिक सभा अधिनियमातील तरतुदी नुसार घेणे व शासनाने नेमुन दिलेल्या वित्तीय वर्षातील ग्रामसभा व महिला ग्रामसभा अधिनियमातील तरतुदी नुसार घेणे बंधनकारक असताना घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रल्हाद गंगाधर मद्देवाड यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांचेकडे तक्रार करुन उर्वरीत कालावधीसाठी अपात्र ठरवण्याची मागणी केली होती.
या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी नायगाव यांच्याकडून चौकशी अहवाल मागवला. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ७ अन्वये प्रतिवादी सरपंच ग्रामपंचायत कांडाळा यांनी आर्थिक वर्ष २०२१-२२ व २०२२-२३ मध्ये नियमाप्रमाणे ग्रामसभा घेतल्या नसल्याचे अभिलेख्यावरून दिसून येते. त्याचबरोबर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३६ अन्वये प्रतिवादी सरपंच ग्रामपंचायत कांडाळा यांनी नियमाप्रमाणे दर महिन्यात मासिक सभा घेतल्या नसल्याचे अभिलेख्यावरून दिसून येते असा अहवाल सादर केला.
दाखल तक्रार व गटविकास अधिकाऱ्यांचा अहवाल यावर तक्रारदार व सरपंच यांच्या वकीलांनी आपापली बाजू मांडली. दोन्ही बाजू समजून घेतल्यानंतर सरपंच बेबीताई नागोराव इरेवाड यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम ७ चे उल्लंघन केल्याचे दिसून येत असल्यामुळे त्यांना कालावधीसाठी सरपंच कांडाळा ता. नायगांव या पदावर राहण्यास अपात्र ठरविण्यात येत असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिला आहे.
सरपंच बाई नावालाच असते कारभार तर पती पाहतो.. नवर्यावर कारवाई करावी