चढ्या दराने खताची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करा : भाजपची मागणी
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : विविध खताची चढ्या दराने विक्री करुन शेतकऱ्यांची लुट करणाऱ्या खत दुकानदारांची चौकशी करुन त्यांचे परवाने रद्द करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसीलदार नायगाव यांचेकडे दि.१९ ला करण्यात आली आहे.
नायगाव शहर व तालुक्यातील काही खत दुकानदार हे कृषी अधिकाऱ्यांशी संगणमत करुन शेतकऱ्यांची नेहमीच लुट करतात. कापूस बियाणे विक्रीतही शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात अर्थिक पिळवणूक करण्यात आली. गरजवंत शेतकऱ्यांची अडचण ओळखून काही दुकानदार लिंकींग करुन नको असलेले बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा उद्योग केला आहे मात्र कृषी विभाग बघ्यांची भुमिका घेतला आहे. आता खत विक्रीतही शेतकाऱ्यांची लुट चालू असल्याने भाजप आक्रमक झाली आहे.
भाजपचे शहराध्यक्ष माधव पाटील कल्याण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी तहसीलदारांची भेट घेवून निवेदन दिले आहे. पेरणीच्या तोंडावर शेतकरी विविध समस्यामुळे त्रस्त असताना कृषी दुकानदार त्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम करत आहेत. खत व बियाणांची विक्री करतांना शासनाने ठरवून दिलेल्या दरात विक्री न करता अधिकचे पैसे घेत असल्याचे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले असून या प्रकरणाची चौकशी करुन संबधीत दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात यावेत अशी मागणी केली आहे.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष माधव पाटील कल्याण, देविदास पाटील बोमनाळे, बळीराम वडजे, जुनैद पठाण व ओमकार पांचाळ यांची उपस्थिती होती.