वंचितचा कमजोर उमेदवार व एम आय एम चा उमेदवार नसल्याचा फायदा काँग्रेसला ?
संविधान बदलण्याच्या मुद्याचा व मराठा आरक्षणाचा फटका भाजपला

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता.२६) जिल्ह्यात मतदान पार पडले असून. सरासरी मतदान ६०.३० टक्के झाल्याची माहिती मिळाली. यावेळी वंचितच्या कमजोर उमेदराचा आणि एम. आय. एम. चा उमेदवार नसल्याचा फायदा काँग्रेसला. तर दुसरीकडे संविधान बदलण्याच्या मुद्याचा आणि मराठा आरक्षणाचा फटका भाजपालाच बसणार असल्याचा अंदाज मतदानानंतर व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यावेळी ५ टक्के मतदान कमी झाली आहे.
काँग्रेसचे वसंतराव चव्हाण, भाजपचे खा.प्रतापराव चिखलीकर, वंचितचे अविनाश भोसीकर यांच्यासह सर्वच २३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. शुक्रवारी सकाळी ७ वाजता सूरू झालेले मतदान रात्री उशिरा पर्यंत सूरूच होते. शुक्रवारी सायंकाळी सरासरी ६०.३० टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसच्या वतीने नायगावचे भुमिपूत्र व माजी आमदार वसंतराव चव्हाण हे मैदानात होते तर भाजपच्या वतीने विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी मिळाली. नांदेड जिल्ह्यात भाजपाबद्दल नकारात्मक वातावरण निर्माण झाल्याने चिखलीकरांना उमेदवारी मिळते का नाही याबाबत सांशकता होती. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने चिखलीकरांची ताकत वाढली असल्याचा गवगवा करण्यात आला होता.
अशोकराव चव्हाणासारखा नेता भाजपमध्ये गेल्यानतरही भाजप बँकफुटवरच दिसून येत असल्याने नांदेड जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांच्या सभा घेवून परिस्थिती बदलण्याचा जोरदार प्रयत्न झाला. तरीही परिस्थिती बदलली नाही. उलट मराठा आरक्षणाचा रोषाचा फटका भाजपलाच बसणार असून.
त्याचबरोबर संविधान बदलण्याच्या मुद्यावरुन मागासवर्गीय, मुस्लिम समाजाने आपले वजन एकजुटीने काँग्रेसच्या पारड्यात टाकला आहे. यावेळी पारंपरिक मतदार काँग्रेस सोबत तर होताच पण मराठा आणि भाजपवर नाराज असलेल्या मतदारांनी काँग्रेसचा हात मजबूत केल्याने काँग्रेसकडून विजयाचा दावा केला जात आहे.
सर्वात महतवाची बाब म्हणजे यावेळी वंचित बहूजन आघाडीने दिलेल्या उमेदवाराची काहीही जादू चालली नाही तर दुसरीकडे एम आय एम ने ही उमेदवार दिला नसल्याचा फायदा काँग्रेसलाच होणार आहे असल्याचे बोलल्या जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदान
भोकर – 294409 पैकी 192463 मतदान सरासरी 65.37, नांदेड उत्तर 346886 पैकी 211054 सरासरी टक्केवारी 60.84, नांदेड दक्षिण 308790 पैकी 181723 सरासरी 58.85 टक्केवारी, नायगाव 301299 पैकी 181723 सरासरी 65.32 टक्के, देगलूर 303943 पैकी 181537 सरासरी 59.76 टक्के आणि मुखेड 296516 पैकी 168571 मतदान झाले असून सरासरी 56.85 टक्के असा एकू जिल्ह्यातील 69.30 टक्के मतदान झाले आहे.
नांदेड जिल्ह्यात सहा विधानसभा मतदार संघ असून सहा मतदार संघाची यंदाची ६०.३० एवढी टक्केवारी आहे तर २०१९ ला ६५.१८ होती. २०१९ च्या तुलनेत यावेळी ५ टक्के मतदान कमी झाले याचे नुकसान कुणाला होणार आहे. त्याचबरोबर वाढलेले नव मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात हे ही महत्त्वाचे आहे.