भाजप कार्यकर्ता मेळाव्याला खा.अशोकराव चव्हाणांची दांडी : खतगावकरांचाही अपमान
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : विधानसभा मतदारसंघाचा बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व कार्यकर्ता मेळावा गुरुवारी नायगाव येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दांडी मारल्याने कार्यक्रमस्थळी दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. तर दुसरीकडे माजी खासदार व जेष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांचे भाषण सुरु असताना त्यांच्या भाषणात वारंवार व्यत्यय आणत असताना आणि काही जण अपमान करत असतांना एकाही नेत्यांनी तो प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला नाही हे विशेष.
भाजपने विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केल्यानंतर गुरुवारी नायगाव येथील जयराज मंगल कार्यालयात विधानसभा मतदारसंघाचा बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण येणार असल्याचे सांगण्यात आले होते आणि व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बँनरवर मोठ्या अक्षरात अशोकराव चव्हाण यांचे नावही होते. पण शेवटपर्यंत अशोकराव चव्हाण आलेच नाहीत.
चव्हाण न आल्याने मतदारसंघात वेगळा मेसेज जाईल असे अनेकांना वाटत होते आणि ते यावेत यासाठी प्रयत्नही झाला पण अशोकराव आलेच नाहीत त्यामुळे मेळाव्याच्या ठिकाणी दबक्या आवाजात तर चर्चा होत होतीच पण नायगाव मतदारसंघात जो मेसेज जायचा होता तो गेला आहे.
खतगावकरांचा अपमान…
मेळावा सुरु झाल्यानंतर माजी खासदार तथा जेष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर हे उपस्थित झाले. त्यांना भाषण करण्याची संधीही देण्यात आली पण काहींनी वारंवार त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करण्यात तर आलाच पण एका उत्साही कार्यकर्त्यांने थेट भाषण बंद करण्याचीही दम दिला. एका विशिष्ट नेत्यांच्या कार्यकर्त्याकडून खतगावकर सारख्या जेष्ठ नेत्यांचा अपमान होत असताना तो प्रकार थांबवण्याचा प्रयत्न कुणीही केला नसल्याने याचा वेगळाच अर्थ काढण्यात येत आहे.
बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व कार्यकर्ता मेळाव्यात भाजपची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी मार्गदर्शन होणे आवश्यक असताना अनेक वक्यांनी एका नेत्यावर स्तुति सुमने उधळण्याचाच उद्योग केल्याने हा कार्यकर्ता मेळावा होता की स्तुतीसुमने उधळण्याचा कार्यक्रम होता अशी चर्चा होत आहे.