मराठी माध्यमांच्या शाळा वाचविण्याची पालकांची जबाबदारी आणि सरकारची भूमिका
नायगाव येथे परिसंवादाचे आयोजन

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : मराठी माध्यमांच्या शाळा वाचविण्याची पालकांची जबाबदारी आणि सरकारची भूमिका या विषयावर (ता.१५) रोजी सायंकाळी ५ वाजता नायगाव येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
नायगाव येथील राजर्षी शाहू महाराज वैचारिक सभागृहात होणाऱ्या या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांतराव सोनखेडकर हे राहणार असून या परिसंवादाचे उद्घाटन दैनिक युगांतरचे पत्रकार रघुनाथ सोनकांबळे यांच्या हस्ते होणार आहे तर या परिसंवादात व्याख्याते म्हणून जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे यांची उपस्थिती राहणार आहे. याच परिसंवादात सेवानिवृत्त नायब तहसीलदार राम पंगे आणि आरोग्य कर्मचारी मल्हारराव तोटरे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. याच परिसंवादाच्या निमित्ताने नायगाव येथील सर्व पत्रकार बंधूंचे त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल आणि विविध लिखाणाबद्दल सत्कार करण्यात येणार आहे.
सदरील परिसंवादाचे आयोजन करण्यामागील उद्देश असा की मराठी माध्यमांच्या शाळेतील सर्वच शिक्षक अतिशय हुशार आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेले आहेत. या शाळेकडे शासनाचे दुर्लक्ष आणि भौतिक साधनांची कमतरता असल्यामुळे आपल्या पाल्यांना प्रवेश न देता इंग्रजी माध्यम शाळेमध्ये भरमसाठ रुपये खर्च करून प्रवेश दिला जात आहे. मात्र एक बाब पालक लक्षात घेत नाहीत की इंग्रजी माध्यम शाळेमध्ये शिकविणारे सर्वच शिक्षक मराठी माध्यम शाळेतून शिक्षण घेतलेले आहेत आणि तेच शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिकवतात.
याचा अर्थ मराठी माध्यमातील शिक्षक व विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिकवू शकतो पण इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठीचे सखोल ज्ञान नसते. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा वरचष्मा आहे. या सर्व बाबी पालकांना समजणे आज काळाची गरज झाली आहे. म्हणून मराठी माध्यमांच्या शाळा जगविने सर्व महाराष्ट्रीयन पालकांची जबाबदारी आहे. त्या दृष्टीने सरकारला भूमिका घेण्यास भाग पाडणे हेही महाराष्ट्रीयन लोकांची जबाबदारी आहे. येणाऱ्या काही वर्षामध्ये मराठी माध्यमांच्या शाळा जगविण्यासाठी पालकांनी कठोर भूमिका नाही घेतल्यास मराठी माध्यमांच्या शाळा बंद होऊन इंग्रजी माध्यम शाळांची एकाधिकारशाही निर्माण होईल. तेव्हा कोणताच पर्याय सामान्य माणसाच्या समोर राहणार नाही. म्हणून मराठी माध्यमांच्या शाळा टिकविणे आणि जगविने सामान्य माणसाचीच मोठी जबाबदारी आहे.
यासाठीच सदर परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिसंवादास अधिकाधिक लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीतील प्रा डॉ.शंकर गड्डमवार, रा ना मेटकर, अॅड बापूराव वाघमारे, भीमराव बैलके, इंजि.शंकर माळगे, शंकर पवार, डॉ. पी पी गायकवाड, माधव सोंजे, डॉ भीष्म झुंजारे, साहेबराव बापूले, बापूराव गायकवाड, प्रमोद केसराळीकर, अॅड हरीदास बैलकवाड, राजू गायकवाड इ नी केले आहे.



