हरवलेल्या दोन महिला सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन कुंडलवाडी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

कुंडलवाडी :- कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपास करत हरवलेल्या एका तरुणीसह एका महिलेचा शोध घेऊन त्यांना सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. या कामगिरीमुळे कुंडलवाडी पोलिसांचे कौतुक होत आहे.
कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव (कुं.) येथील १९ वर्षीय शिवानी मोहन मदनुरे ही २५ मे २०२६ रोजी राहत्या घरातून निघून गेली होती. याप्रकरणी तिचे वडील मोहन मोगलाजी मदनुरे यांनी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांनी तातडीने शोधमोहीम राबविण्याचे आदेश दिले.
कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरी, पोलीस कर्मचारी शिवराज गंगुलवार, आनंद बोडके व संतोष संगेवार यांनी सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपास करून पुणे येथून शिवानी मदनुरे हिचा शोध लावला. त्यानंतर तिला सुखरूप तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
दरम्यान, दुसऱ्या एका प्रकरणात कुंडलवाडी शहरातील बुरूड गल्ली परिसरातील रेखा उर्फ मुन्नी सायलू गुडमुलवार या 26 जुलै 2026 रोजी राहत्या घरातून निघून गेल्या होत्या. याप्रकरणी त्यांचे पती सायलू उर्फ राजू रामलू गुडमुलवार यांनी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणातही उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरी, शिवराज गंगुलवार, आनंद बोडके व व्यंकट घोंगडे यांनी सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपास करत नांदेड येथून संबंधित महिलेचा शोध लावला. त्यानंतर त्यांना सुखरूप त्यांच्या पतीच्या स्वाधीन करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांनी जिल्ह्यातील हरवलेल्या महिला व मुलींचा शोध घेण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कुंडलवाडी पोलिसांनी दोन्ही प्रकरणांचा यशस्वी छडा लावत संबंधित महिला व तरुणीला त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुरक्षित पोहोचविले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी सांगितले की, चालू वर्षात कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार महिला हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी तीन जणींचा यशस्वी शोध घेण्यात आला आहे. उर्वरित एका हरवलेल्या महिलेचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.



