खैरगावच्या वादग्रस्त ग्रामसेवकाला अभय कुणाचे? : भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतरही निलंबनाऐवजी नवे गाव!

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : तालुक्यातील खैरगाव येथील वादग्रस्त ग्रामसेवक शेख मुर्तजा यांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक सुरस कथा असून. त्यांनी यापूर्वी गडगा, मांजरम, कुष्णूर व लालवंडी ग्रामपंचायतमध्येही आपले अर्थिक गैरव्यवहाराचे प्रचंड गुण उधळले आहेत. गडगा ग्रामपंचायतचा कारभार असताना शौचालय अनुदान व १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत भ्रष्टाचार केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झालेले असून. आताही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखडे त्यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे लालवंडी आणि खैरगाव येथील कारभार प्रचंड वादग्रस्त ठरलेला असताना ते आजही उजळ माथ्याने फिरत आहेत हे विशेष.
नायगाव पंचायत समितीचा कारभार गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखडे यांनी घेतल्यानंतर कारभारात अमुलाग्र बदल झाला. पंचायत समितमध्ये कुणाचा पायपोस कुणाला राहीला नाही. अधिकारी आणि कर्मचारी त्यांना वाटेल तेव्हा येतात आणि जातात. त्यामुळे विविध योजनेच्या लाभार्थ्यांना एका कामासाठी अनेकवेळा पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागतात. तेव्हा कुठे एखादवेळी गटविकास अधिकारी भेटतात. घरकुल विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे तर नायगाव पंचायत समिती जिल्हाभर बदनाम झाली. वानखडे यांच्या काळातच तब्बल १४ कंत्राटी अभियंत्यांना घरी जावे लागले असताना आजपर्यंत पंचायत समितीच्या कारभारात कुठलीच सुधारणा झाली नाही उलट भ्रष्टाचाराची बजबजपुरी बनली आहे.
पंचायत समितीच्या या अनागोंदी कारभारामुळे जनमानसात प्रचंड असंतोष आहे. दुसरीकडे काही ग्रामसेवक तर वादग्रस्त कारभार आणि भ्रष्टाचार करणे हा जन्मसिध्द अधिकार असल्यासारखे वागत आहेत. विशेष म्हणजे जेथे जाईल तेथे भ्रष्ट कारभार आणि वाद हे ग्रामसेवक शेख मुर्तजा यांचे समिकरणच बनले आहे. मुर्तजा यांच्या मागच्या सात आठ वर्षाच्या कारभाराचे गणित केल्यास वाद आणि भ्रष्टाचार एवढेच उत्तर येते. तरीही ते थांबायला तयार नसून खैरगावचा कारभार घेतल्यापासून पुन्हा वाद सुरु झाला. पंधरा वित्त आयोगासह इतर निधी आणि जलजीवन मिशन योतनेच्या कामातील अनियमितता चव्हाट्यावर आल्यानंतर तक्रारी वाढल्या.
गटविकास वानखडे यांनी या तक्रारीची दखल घेण्याऐवजी मुर्तजा यांना पाठीशी घालण्याचा उद्योग केला परिणामी या तक्रारीची व्याप्ती वाढतच गेली आणि तक्रारीच्या अनुषंगाने खैरगाव ग्रामपंचायतमधील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी माहूर गटविकास अधिकारी यांच्या अधिपत्याखाली समिती गठीत करण्यात आली. या समितीनेही कसून चौकशी केली नाही ग्रामसेवक मुर्तजा यांनी अभिलेखे समिती समोर सादर केले नाहीत.
एवढ्या गंभीर प्रकरणात केवळ तांत्रिक मुद्दे उपस्थित करुन चौकशीचा खेळ चालू असताना नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वानखडे मुकदर्शक बनून बघत राहिले पण मुर्तजा यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही. गटविकास अधिकारीच वादग्रस्त व भ्रष्ट असा शिक्का बसलेल्या ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्याऐवजी त्यांना आता नवीन गाव देण्यात आले असून तेथे नव्याने भ्रष्टाचार करण्यासाठी मार्ग मोकळा करुन दिला आहे.



