ताज्या बातम्यानांदेडनायगांव

सुट्टीचे कारण दाखवून खैरगाव ग्रामपंचायतमधील अभिलेखे तत्काळ ताब्यात घेण्यास विस्तार अधिकाऱ्यांचा नकार : तक्रारदाराने गाठले पोलीस ठाणे

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : खैरगाव ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण गंभीर वळणावर पोहचल्याने वरिष्ठानी गटविकास अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यामुळे ग्रामपंचायतचे अभिलेखे तत्काळ ताब्यात घेण्यात यावे आणि अभिलेखे उपलब्ध न झाल्यास फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्यात यावी असे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी विस्तार अधिकाऱ्यांना दिले. मात्र शनिवार व रविवारी सुट्टी असल्याच्या कारणावरून विस्तार अधिकाऱ्यांनी सोमवारी किंवा मंगळवारी दप्तर ताब्यात घेवू असे उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने तक्रारदाराने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली व गटविकास अधिकाऱ्यासह विस्तार अधिकाऱ्याची स्टेशन डायरीला नोंद घेण्याची मागणी केली आहे.

विजय सोनकांबळे यांनी तालुक्यातील खैरगाव ग्रामपंचायतमध्ये सन २०२० ते २०२६ या ६ वर्षांच्या कालावधीतील १५ वा वित्त आयोग व जलजीवन मिशनच्या १ कोटी ९३ लाख ४६ हजार रुपयांच्या महाघोटाळ्याच्या चौकशीच्या अनुषंगाने मुख्य आरोपींवर फौजदारी गुन्हे नोंदवण्यासाठी तक्रार केली होती. जिल्हा परिषद व विभागीय आयुक्त स्तरावरून चौकशी करण्याचे आदेश झाले. तरीही नायगाव पंचायत समितीचे वादग्रस्त गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखडे यांनी तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

त्यामुळे तक्रारदार विजय सोनकांबळे यांनी पुन्हा विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषदेकडे तक्रार केली. त्यानंतर वरिष्ठानी गटविकास अधिकांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. त्यामुळे गटविकास अधिकारी वानखडे यांनी दि. ३० आक्टोबर रोजी खैरगावचे सर्व मूळ दप्तर ‘तात्काळ’ जप्त करण्याचे आणि उपलब्ध न झाल्यास आरोपींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश विस्तार अधिकारी पी. एस. जाधव यांच्या नावे जारी केले आहेत.

गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आदेशात ‘तात्काळ’ दप्तर ताब्यात घेण्याचा कडक हुकूम असतानाही, आज दिनांक ३१/१०/२०२६ रोजी मी प्रत्यक्ष गटविकास अधिकारी व नियुक्त विस्तार अधिकारी पी. एस. जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी “आज शनिवार आणि उद्या रविवार शासकीय सुट्टी असल्याने आम्ही जप्तीसाठी येणार नाही, सोमवार-मंगळवारी चौकशी करू” असे उडवाउडवीचे व बेजबाबदार उत्तर दिले. जप्तीचा लेखी आदेश झाल्यानंतरही तब्बल ३ दिवस कारवाई प्रलंबित ठेवणे म्हणजे मुख्य आरोपींना मूळ रोखवही आणि व्हाउचरमध्ये खाडाखोड करून पुरावे नष्ट करण्यासाठी उघडपणे वेळ मिळवून देणे आहे, हे स्पष्ट दिसत आहे.

अधिकाऱ्यांच्या उत्तरानंतर विजय सोनकांबळे यांनी एक लेखी तक्रार नायगाव पोलीस ठाण्यात दि. ३१ आक्टोबर रोजी दिली असून सदरच्या तक्रारीत या ३ दिवसांच्या सुट्टीत जर खैरगावच्या मूळ दप्तराचा नाश झाला, तर त्याला नायगाव पंचायत समितीचे अधिकारी वैयक्तिक जबाबदार राहतील असे नमूद केले आहे. शासकीय समितीसमोरून शासकीय रेकॉर्ड चोरून नेऊन पुराव्यांचा नाश केल्याप्रकरणी मुख्य आरोपी ग्रामसेवक मुर्तुजा शेख, सरपंच व उपसरपंच यांच्यावर भारतीय न्याय संहिता अंतर्गत शासकीय दप्तर चोरी व फसवणुकीचा तात्काळ फौजदारी गुन्हा नोंदवण्यात यावा. जप्तीचे लेखी आदेश असतानाही शनिवार-रविवार सुट्टीचे कारण सांगून गुन्हेगारांना पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ मिळवून देणारे गटविकास अधिकारी नायगाव व विस्तार अधिकारी पी. एस. जाधव यांच्या गंभीर कर्तव्यकसुरीची पोलीस स्टेशन डायरीत अधिकृत नोंद करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

प्रशासनाकडील तक्रारीनंतर तक्रारदाराने थेट पोलीस ठाणे गाठल्याने खैरगाव ग्रामपंचायतमधील अर्थिक भ्रष्टाचाराचा विषय गंभीर वळणावर गेला असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!