कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी व्हि.बी.कांबळे यांची नियुक्ती

नांदेड :- मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेल्या कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या अखत्यारितील कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी विस्तार अधिकारी व्हि.बी.कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अँड.कृष्णा इंगळे यांच्या स्वाक्षरीसह त्यांच्याच हस्ते दि.१९ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय अधिवेशनात नागपूर येथे महासंघाचे कार्याध्यक्ष गणेश मडावी, उपाध्यक्ष अशोक गोडबोले, महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्याम कावळे,विजय वाघमारे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व्हि.बी.कांबळे यांना कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, जिल्हा शाखा,नांदेडच्या जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले असून आगामी दोन वर्षासाठी सदरच्या नियुक्तीसह त्यांना जिल्हा व तालूका कार्यकारिणी नियुक्ती / निवडीचे अधिकार देण्यात आल्याचे त्यात नमूद आहे.
कांबळे यांनी नांदेड जिल्हा परिषदेत सन् १९९३ मध्ये ग्रामसेवक या पदावर रुजू झाल्यापासून जिल्हा परिषद सेवेत ग्राम विकास विभागात गटविकास अधिकारी पदापर्यंतचा अनूभव गाठीशी ठेवून ग्रामीण भागातील जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे पासून ते मुख्यालयातील समाजकल्याण,पंचायत विभागात काम करतांना विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले आहेत.मुखेड तालुक्यात अनेक गावात काम करण्यापासून हिमायतनगर, मुदखेड,भोकर,किनवट येथेही यापूर्वी कामकाज सांभाळून ते सध्या पंचायत समिती,नांदेड येथील पंचायत विभागात विस्तार अधिकारी या पदावर कर्तव्यतत्परतेने मागील तीन वर्षांपासून यशस्वीपणे कार्यरत आहेत.
ग्रामस्तरावर काम करणारे सर्वच समाजघटकांतील व मागासवर्गीय कर्मचारी यांच्या शासकीय तसेच,सार्वजनिक किंवा वैयक्तिक अडचणी प्रशासनाकडून सोडवितांनाच संघटनात्मकवाढीसाठीही अग्रेसर राहणारा निर्भीड मित्रप्रेमी व मोठ्या मनाचा, नेहमी सकारात्मक विचारश्रेणीचा माणुस आणि आपले नियमीत काम सांभाळून इतरांची मदत करण्यासाठी वेळोवेळी तत्पर असणारे सहकारी कर्मचारी म्हणून ते सुपरिचित आहेत.
कांबळे यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत व कौतुक होत असून जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



