गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

आदमपूरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट ; रामतीर्थचे एपीआय विक्रम हराळे व बिट जमादार सूर्यवंशी यांच्या बदलीची मागणी

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : आदमपूर आणि परिसरात कथित अवैध धंद्यांना आळा घालण्यात रामतीर्थ पोलिसांना अपयश येत असल्याचा आरोप करत पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे आणि आदमपूर बिटचे जमादार लक्ष्मण सूर्यवंशी यांची तात्काळ बदली करावी, अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा आदमपूर येथील ज्येष्ठ नागरिक, पत्रकार तथा ग्रामपंचायत सदस्य गंगाधर पंगलवार यांनी दिला आहे.

पंगलवार यांनी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आदमपूर बिटमध्ये अवैध धंदे वाढल्याचा आरोप केला आहे. देशी-विदेशी दारूची विक्री, मटका, गुटखा, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री तसेच रात्रीच्या वेळी अवैध आणि ओव्हरलोड टिप्पर, ट्रॅक्टर व ट्रकद्वारे रेती वाहतूक सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारांमुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आदमपूर व परिसरातील काही बार आणि बिअर शॉपीमधून अवैध मद्यविक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मद्यपींच्या वावरामुळे महिला, मुली आणि सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे पंगलवार यांनी तक्रारीत नमूद केले आहे. रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या रेती वाहतुकीकडेही पोलिसांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

अवैध धंद्यांबाबत संबंधित बिट जमादारांकडे तक्रार केली असता, गावात भांडणे किंवा मारामारी होत असेल तरच सांगा, अशा आशयाचे उत्तर मिळाल्याचा दावा पंगलवार यांनी केला आहे. अवैध धंदे करणाऱ्यांशी संबंधित पोलिसांचे आर्थिक हितसंबंध असल्याचाही आरोप त्यांनी केला असून, या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी पुढे आली आहे.

जुगार कारवाईवरही संशयाची चर्चा…
आदमपूर येथील १६ ऑक्टोबर रोजीच्या जुगार अड्ड्यावरील पोलीस कारवाईनंतरही विविध प्रश्न उपस्थित झाले होते. त्या कारवाईतील मुद्देमाल आणि रोख रकमेच्या नोंदींबाबत चर्चा सुरू असतानाच आता पंगलवार यांच्या निवेदनामुळे आदमपूर बिटमधील पोलिसांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आदमपूर बिटचे जमादार सूर्यवंशी यांच्या वागणुकीबाबतही नागरिकांमध्ये नाराजी असल्याचा दावा करण्यात येत आहे. अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असेल, तर संबंधित यंत्रणेची जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी काय भूमिका घेणार..?
एका बाजूला दुष्काळी परिस्थिती, कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न आणि सामान्य नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची असताना दुसऱ्या बाजूला अवैध धंद्यांबाबत वारंवार तक्रारी होत असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक या तक्रारीची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करणार का, तसेच अवैध धंद्यांवर प्रत्यक्ष कारवाई होणार का, याकडे आदमपूर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. बदली आणि आमरण उपोषणाच्या इशाऱ्यामुळे आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!