बिलोलीत ‘कट्टी’च्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट! आडत व्यापाऱ्यांच्या मनमानीविरोधात ‘प्रज्ञाराष्ट्र मोर्चा’ आक्रमक
आडत व्यापाऱ्यांची चौकशी करून फौजदारी कारवाई करण्याची तहसीलदार व सहाय्यक उपनिबंधकांकडे निवेदनाद्वारे मागणी

डॉ.सोपान गारे
बिलोली : सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आसमानी व सुलतानी संकटांचा सामना करत खरीप हंगामातील पिके वाचवण्याचा आणि पिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, कष्टाने पिकवलेला माल बाजारात विकताना बिलोली तालुक्यातील आडत व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. ‘कट्टी’ आणि ‘काटे हमाली’च्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून राजरोसपणे शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप करत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि ‘प्रज्ञाराष्ट्र मोर्चा’च्या वतीने प्रशासनाकडे धाव घेतली आहे.
शासनाच्या नियमानुसार बाजारात शेतीमालाची खरेदी-विक्री होणे बंधनकारक असताना, बिलोली येथील आडत व्यापारी शासकीय नियमांना हरताळ फासत आहेत. व्यापाऱ्यांकडून प्रति क्विंटल तब्बल ४ किलो अतिरिक्त माल (कट्टीच्या नावाने) काढून घेतला जात आहे. म्हणजेच ५० किलोच्या पोत्यामागे ५२ किलो माल वसूल केला जात आहे. याशिवाय ‘काटे हमाली’च्या नावाखाली शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे अतिरिक्त रक्कम उकळली जात आहे. व्यापाऱ्यांच्या या गोरखधंद्यामुळे घाम गाळून माल पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे
व्यापाऱ्यांच्या या बेकायदेशीर कपातीविरोधात आणि मनमानीविरोधात ‘प्रज्ञाराष्ट्र मोर्चा’च्या वतीने १५ ऑक्टोबर २०२६ रोजी बिलोलीचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि सहाय्यक उपनिबंधक (सहकार) यांना संयुक्त निवेदन देण्यात आले.
निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:
वजन काट्यांची पडताळणी: तालुक्यातील सर्व आडत व्यापाऱ्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्या वजन-काट्यांची त्वरित पडताळणी केली जावी. हमाली कपातीची चौकशी: ‘काटे हमाली’च्या नावाखाली केली जाणारी अतिरिक्त रक्कम वसुली तात्काळ थांबवून याची चौकशी व्हावी. फौजदारी कारवाई: शासकीय नियमांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांकडून अतिरिक्त माल व रक्कम उकळणाऱ्या दोषी व्यापाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कायदेशीर फौजदारी कारवाई करण्यात यावी.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी देण्यात आलेल्या या निवेदनावर गौतम लक्ष्मण भालेराव, मोहन मारोती जाधव, राजकुमार विठ्ठलराव गादगे, मारोती हुलबाजी कांबळे, सोपान मोगलाजी गारे, गंगाधर शंकर ईबीतकर, हर्षवर्धन कांबळे, उमेश बारुळे आणि सुनील पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास आणि दोषी व्यापाऱ्यांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी शेतकरी बांधवांकडून देण्यात आला आहे.



