कुंडलवाडी पोलिसांची पिंपळगाव शिवारात जुगार अड्ड्यावर धाड ; आठ जणांना अटक

New Bharat Times नेटवर्क
कुंडलवाडी :- कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव खुर्द शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कुंडलवाडी पोलिसांनी धाड टाकून आठ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रकमेसह तीन मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ३१ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव खुर्द शिवारातील महालक्ष्मी मंदिराच्या बाजूला काही जण संगनमताने तीन मोटारसायकली लावून गोलाकार बसले होते. तेथे तिर्रट नावाचा जुगार पत्त्यांवर पैसे लावून खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. आरोपी हनुमंत मोहन मदनुरे (रा. पिंपळगाव), रामदास बापूराव बोगरे (रा.चिरली) फिरोज हाजीनखाँ पठाण( रा.पिंपळगाव) अविनाश गंगाधर चिलकेवार (रा.पिंपळगाव ) आनंदा देवराव पिंगळे (रा.चिरली) सोमनाथ मारोती जाधव (रा.पिंपळगाव) लक्ष्मण मोगलाजी मदनुरे (रा.पिंपळगाव), हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची मोटारसायकल क्रमांक MH.26 CS.8909 चा चालक या आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत आरोपींकडून रोख ११ हजार १४० रुपये जप्त करण्यात आले. तसेच लाल रंगाची युगा कंपनीची मोटारसायकल, सुपर स्प्लेंडर कंपनीची मोटारसायकल आणि हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल, अशा तीन वाहनांची किंमत प्रत्येकी ४० हजार रुपये असा एकूण १ लाख ३१ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२२/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया १८ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजून ५९ मिनिटांनी पूर्ण करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस हवालदार संतोष संगेवार, चालक रामेश्वर पाटील, रवींद्र देशमुख, शिवराज गंगुलवार, साईनाथ पुजरवाड, अजय बोलमवार तसेच होमगार्ड कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष संगेवार करीत आहेत.



