नायगाव येथे ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ कार्यशाळा व आढावा बैठक संपन्न
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसह व्यापक जनजागृतीवर भर

New Bharat Times नेटवर्क
नांदेड : ‘सुदृढ आरोग्य – सशक्त गाव – समृद्ध भारत’ या संकल्पनेतून नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नायगाव येथे तालुकास्तरीय ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ कार्यशाळा व आढावा बैठक उत्साहात पार पडली. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित या कार्यशाळेत राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले.

या कार्यशाळेस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीणकुमार वानखडे, सहाय्यक गटविकास अधिकारी ऋषिकेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत पटवेकर आणि निरीक्षण व मूल्यमापन अधिकारी अनिल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वेळेत आणि तत्पर आरोग्य सेवा देण्यावर भर…
गटविकास अधिकारी प्रवीणकुमार वानखडे यांनी मार्गदर्शन करताना, आरोग्य यंत्रणेने गावांतील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून नागरिकांना वेळेत आणि तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे सांगितले. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न बनविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष सूर्यवंशी यांनी तालुक्यातील सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा उपकेंद्रनिहाय आणि कर्मचारीनिहाय सविस्तर आढावा घेतला. आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश त्यांनी दिले. क्षेत्रीय स्तरावर काम करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन कर्मचाऱ्यांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शनही करण्यात आले. निरीक्षण व मूल्यमापन अधिकारी अनिल कांबळे यांनी वार्षिक उद्दिष्टपूर्तीचा आढावा सादर केला. आरोग्यविषयक कामकाजात गुणवत्तापूर्ण सुधारणा करून निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी मार्गदर्शन केले.
आरोग्य यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग…
या कार्यशाळेस मांजरम येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रद्युम्न पाटील, कुंटूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा शिंदे, डॉ. सुनील वाघमारे, आरोग्य विस्तार अधिकारी महेश मुखेडकर, आरोग्य निरीक्षक अंकुश खिल्लारे यांच्यासह मांजरम, कुंटूर व बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत पटवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मठपती, शैलेश मच्छरलावार, अनुप जगताप आणि सोमेश यांनी विशेष परिश्रम घेतले.



