जि.प.केंद्रीय शाळा कोलंबीच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अनिल बैस यांची बिनविरोध निवड
शाळेच्या गुणवत्तेत भर घालून डिजिटल व आदर्श शाळा बनवण्याचा नवनिर्वाचित अध्यक्षांचा संकल्प

New Bharat Times नेटवर्क
नायगाव : नांदेड जिल्ह्यातील ‘कर्मचाऱ्यांचे गाव’ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या नायगाव तालुक्यातील कोलंबी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची (SMC) पुनर्रचना नुकतीच उत्साही वातावरणात पार पडली. यामध्ये शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सतत धडपडणारे व शिक्षणप्रेमी म्हणून परिचित असलेले श्री.अनिल मधुकरराव बैस यांची अध्यक्षपदी, तर सौ.संजीवनी कमलाकर लांडगे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या निवडीमुळे गावातील शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. “शिक्षण हेच खरे बल आहे” हा विचार केंद्रस्थानी ठेवून कोलंबीच्या जि.प.शाळेचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी ग्रामस्थ आणि पालकांनी एकत्र येत नव्या कार्यकारिणीची निवड केली.
नवनिर्वाचित कार्यकारिणी खालीलप्रमाणे श्री.अनिल मधुकरराव बैस (अध्यक्ष), सौ.संजीवनी कमलाकर लांडगे (उपाध्यक्ष), श्री.राधाकिसन गोविंद चिंतेवाड (सदस्य), श्री.कैलास बालाजी चिंतेवाड (सदस्य), श्री.बालाजी विठ्ठल चिंचोले (सदस्य), श्री.बळवंत आनंदा शिंदे (सदस्य), सौ.आस्मा पिरबाबू सय्यद (सदस्य), श्री.कोंडीबा संभाजी वाघमारे (सदस्य), श्री.गणेश यंकटी डुबुकवाड (सदस्य).
निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल बैस म्हणाले, “कोलंबी हे उच्चशिक्षित आणि शासकीय सेवेत मोठ्या संख्येने कर्मचारी देणारे गाव आहे. गावातील जि. प. प्राथमिक शाळेने अनेक पिढ्या घडवल्या आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, डिजिटल शिक्षण, भौतिक सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी आम्ही सर्व सदस्य कटिबद्ध आहोत. ‘शिक्षित गाव, समृद्ध गाव आणि प्रगत गाव’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी संपूर्ण गाव आणि शाळा व्यवस्थापन मिळून काम करू.”
या निवडीबद्दल कोलंबी गावातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.



