ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

मोटारसायकल परत देण्यासाठी पोलिसाने मागितली ५ हजारांची लाच!

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : पोलीस कारवाईदरम्यान ताब्यात घेतलेली मोटारसायकल परत देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा प्रकार मनाठा पोलीस ठाण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार अशोक दाडे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध १२ ऑगस्ट २०२६ रोजी मनाठा पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलेली मोटारसायकल परत मिळवण्यासाठी पोलीस ठाण्यातील बिट जमादार तथा पोलीस अंमलदार अशोक दाडे यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार संबंधित व्यक्तीने १३ ऑगस्ट रोजी दिली.
तक्रारीच्या अनुषंगाने त्याच दिवशी सायंकाळी ५.३१ वाजण्याच्या सुमारास लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत अशोक दाडे यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम स्वतः स्वीकारण्याची संमती दिल्याचे अहवालात नमूद आहे.

दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी तक्रारदाराने आपल्याला संशय आल्याचे सांगितल्याने त्याच्याकडे यापुढे पैशांची मागणी होणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात लाचेची रक्कम स्वीकारल्याची नोंद अहवालात नाही. तसेच संबंधित पोलीस अंमलदाराला अटक करण्यात आलेली नसून, मनाठा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

लाच मागणीच्या प्रकरणामुळे पोलीस दलातील पारदर्शकता आणि जनतेच्या विश्वासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, या प्रकरणात गुन्हा दाखल होणे, पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!