सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; २४ विद्यार्थ्यांचा सहभाग

नायगाव : विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञानाची आवड निर्माण व्हावी, तसेच लहान वयातच स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी आणि भविष्यात एमपीएससीच्या माध्यमातून वर्ग एक व वर्ग दोनचे अधिकारी घडावेत, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेला विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या परीक्षेत एकूण २४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ शालेय शिक्षणापुरते मर्यादित न राहता सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. याच उद्देशाने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सत्कार संदीप गायकवाड, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सम्यक सिद्धार्थ गायकवाड आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रितिका राजीव वाघमारे यांनी पटकावले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांना आज रात्री ठीक ८ वाजता बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा व पालकांचा असाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यास दर रविवारी नियमितपणे ही स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
ही परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी भूषण काळेवार, अमोल जोंधळे, विक्की लोखंडे, संकल्प जमदाडे, ऋतिक भद्रे, मंगेश बच्छाव, नितीन गायकवाड व रुपेश गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसोबतच त्यांच्यात स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.



