अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी एमएसआयडीसीवर ढकलून नगरपंचायतकडून दिशाभूल?
शासन निर्णयाचा आधार घेतला; पण जबाबदारीच्या तरतुदींचा सोयीस्कर अर्थ लावला !

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : कुंटूर-नायगाव-हेडगेवार चौक रस्त्याच्या चौपदरीकरणातील अतिक्रमणांचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळावर (एमएसआयडीसी) असल्याचे पत्र नगरपंचायत नायगावच्या मुख्याधिकारी गंधाली पवार यांनी कार्यकारी अभियंत्यांना पाठविले आहे. मात्र, या पत्रासाठी आधार घेतलेल्या १० ऑक्टोबर २०१३ च्या महसूल व वन विभागाच्या शासन परिपत्रकातील तरतुदींचा बारकाईने अभ्यास केला असता नगरपंचायतीच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शासन निर्णयाचा आधार घेऊन स्वतःची जबाबदारी दुसऱ्या विभागावर ढकलण्याचा प्रयत्न होत आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नगरपंचायतीने पाठविलेल्या पत्रात शासन परिपत्रकातील तिसऱ्या मुद्द्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. या तरतुदीनुसार शासकीय जमिनीवरील अतिक्रमण रोखणे आणि ते निष्कासित करणे ही संबंधित जमीन ज्या विभागाच्या ताब्यात आहे, त्या विभागाची जबाबदारी आहे. त्यामध्ये नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह अन्य विभागांच्या स्थानिक अधिकाऱ्यांचाही स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यकतेनुसार पोलिसांत फिर्याद दाखल करण्याची जबाबदारीही पार पाडावी, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
असे असताना नगरपंचायतीने केवळ रस्ता एमएसआयडीसीच्या अखत्यारीत असल्याचे सांगून अतिक्रमण हटविण्याची संपूर्ण जबाबदारी महामंडळावर सोपविण्याची भूमिका घेतली आहे. शासन परिपत्रकात संबंधित विभागाची जबाबदारी स्पष्ट केली असली, तरी नगरपंचायतीने या प्रकरणात स्वतःची नेमकी भूमिका काय, याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपंचायत सहकार्य करेल, असे पत्रात नमूद करणे आणि प्रत्यक्ष जबाबदारी स्वीकारणे या दोन वेगळ्या बाबी आहेत.
दुसरीकडे, रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी मंजूर आराखड्यानुसार किती रुंदी आवश्यक आहे, प्रत्यक्षात रस्त्याची हद्द किती आहे, कोणत्या जागेवर अतिक्रमणे आहेत आणि संबंधित जमिनीची मालकी व ताबा कोणाकडे आहे, याबाबत पारदर्शक माहिती नागरिकांसमोर येणे गरजेचे आहे. केवळ पत्रव्यवहार करून अतिक्रमणांचा प्रश्न सुटणार नाही.
शासन परिपत्रकाचा आधार घेऊन जबाबदारी झटकायची आणि सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन हात वर करायचे, अशीच नगरपंचायतीची भूमिका आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. शहराच्या विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या चौपदरीकरणाच्या कामात अडथळे कायम असताना नगरपंचायत आणि एमएसआयडीसी यांच्यात जबाबदारीची चेंडूफेक सुरू राहिली, तर त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.
नगरपंचायतीने शासन परिपत्रकातील सर्व तरतुदींचा विचार करून आपली भूमिका स्पष्ट करावी. अतिक्रमण हटविण्याच्या प्रक्रियेत संबंधित विभागांशी समन्वय साधून ठोस कार्यवाही करावी. अन्यथा, विकासकामाच्या नावाखाली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न होत असल्याचा नागरिकांचा संशय अधिक बळावल्याशिवाय राहणार नाही.



