गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

नरसी परिसर हादरला! तरुणाचा खून करून मृतदेह झाडाला लटकवल्याचा संशय

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : नरसी पोलीस चौकीपासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या नरसी-बिलोली रोडवरील एका लिंबाच्या झाडाला गुरुवारी पहाटे एका २५ ते ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाची अवस्था पाहता ही आत्महत्या नसून घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मृत तरुणाचा चेहरा कापडाने झाकलेला असून दोन्ही हात समोरच्या बाजूला बांधलेले होते. तसेच हातावर जखमांचे व्रण दिसून आल्याने अज्ञात व्यक्तींनी तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह झाडाला लटकवला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच रामतीर्थ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून झाडाला लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह खाली उतरवून पुढील तपास सुरू केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार मृत तरुण हा बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील रहिवासी असून तो फार्मसी क्षेत्रात काम करत असल्याचे समजते. घटनास्थळी मृताच्या पायात मोजे, जवळ एक बॅग आणि पाण्याची बाटली आढळून आली आहे. तरुणाचा खून नेमका कोणत्या कारणातून झाला? त्याचा मृतदेह नरसी परिसरात आणून का लटकवण्यात आला? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे मोठे आव्हान रामतीर्थ पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

ही घटना आत्महत्या नसून नियोजनपूर्वक केलेला खून असल्याची चर्चा परिसरात सुरू असून, या रहस्यमय हत्येचा तपास पोलीस कोणत्या दिशेने करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ज्या अवस्थेत मृतदेह दिसत आहे ती परिस्थिती पाहता लोहगाव येथील तरुणाचा खुनच करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे पण तपास करण्यात एक्सपर्ट असलेले रामतीर्थ पोलीस ठाण्याचे ठाणेदार या घटनेचा तपास कशा प्रकारे करतात याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker