नांदेडमध्ये राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे कुलगुरूंच्या हस्ते थाटात उद्घाटन
२७० खेळाडूंचा सहभाग; सलग २२ वर्षांची परंपरा कायम — सुंदर शेट्टी यांना जीवनगौरव पुरस्कार

New Bharat Times नेटवर्क
नांदेड : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अंतर्गत नांदेड जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आज, १२ ऑगस्ट रोजी यशवंत कॉलेज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे दिमाखात उद्घाटन झाले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून तब्बल २७० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा १२ ते १६ ऑगस्टदरम्यान होणार आहे.
स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे सलग २२ वर्षांपासून या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सलग २२ वर्षे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करणारी नांदेड जिल्हा बॅडमिंटन संघटना देशातील पहिली जिल्हा संघटना असल्याचा मान संघटनेला मिळाला आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चास्कर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव सिद्धार्थ पाटील, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे माजी सचिव तथा ज्येष्ठ बॅडमिंटन प्रशासक सुंदर शेट्टी यांना नांदेड जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. शेट्टी यांनी पाच दशकांहून अधिक काळ निस्वार्थपणे बॅडमिंटनच्या विकासासाठी योगदान दिले आहे. त्यांची कार्यनिष्ठा, संघटन कौशल्य आणि बॅडमिंटनच्या विकासासाठी केलेले दीर्घकालीन कार्य यामुळे ते क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.
स्पर्धेत पुरुष व महिला एकेरी, दुहेरी तसेच मिश्र दुहेरीचे सामने रंगणार आहेत. पुणे येथील पारिजात नातू हे स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून काम पाहत आहेत.
यावेळी बोलताना कुलगुरू चासकर म्हणाले की , स्व. माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यामुळे मराठवाड्याचे भाग्य उजळले. तर शारदा भवन संस्थेमुळे खेळाडूंना मोठी संधी मिळाली आहे. या संधीच खेळाडूंनी सोन करावे असेही ते म्हणाले.



