नांदेड जिल्ह्यात तीन नवीन अपर तहसीलदार कार्यालयांना मंजुरी
हदगाव, मुखेड व किनवट तालुक्यातील नागरिकांना मिळणार महसूल सेवा अधिक जवळ

प्रभाकर लखपत्रेवार
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील हदगाव, मुखेड आणि किनवट तालुक्यांतील वाढते कामकाज, भौगोलिक अंतर आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन राज्य शासनाच्या महसूल विभागाने तीन नवीन अपर तहसीलदार कार्यालये कार्यान्वित करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी मुख्य तहसील कार्यालयाच्या ठिकाणी वारंवार जाण्याची गरज कमी होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार हदगाव तालुक्यातील तमसा, मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद आणि किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे अपर तहसीलदार कार्यालये कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार हदगाव तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात हदगाव, निवघा, तळणी, बरडशेवाळा आणि पिंपरखेडे अशी ५ महसूल मंडळे, तर तमसा अपर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात तमसा, आष्टा आणि मनाठा अशी ३ महसूल मंडळे राहणार आहेत.
मुखेड तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मुखेड, जांब (बु.), चांडोळा, येवती आणि जाहूर अशी ५ मंडळे, तर मुक्रमाबाद अपर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मुक्रमाबाद, बाह्राळी आणि अंबुलगा बु. अशी ३ मंडळे असतील. त्याचप्रमाणे किनवट तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात किनवट, बोधडी (बु.), तेल्हारी, मांडवी, उमरी (ता.) आणि इस्लापूर (मो.) अशी ६ मंडळे, तर इस्लापूर अपर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात इस्लापूर, जलधारा आणि शिवणी अशी ३ मंडळे निश्चित करण्यात आली आहेत.
नवीन अपर तहसीलदार कार्यालयांसाठी आवश्यक आस्थापना, अधिकारी-कर्मचारी तसेच कार्यालयीन व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. नवीन कार्यालये सुरू होईपर्यंत तात्पुरती कार्यालयीन जागा निश्चित करून त्यानंतर कायमस्वरूपी जागेचा प्रस्ताव शासनास सादर करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे हदगाव, मुखेड आणि किनवट तालुक्यातील नागरिकांना महसूल प्रशासन अधिक गतिमान आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महसूल विभागाच्या विविध कामांसाठी नागरिकांना मिळणारी ही सुविधा प्रशासनाच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.



