ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

राज्य नाट्यस्पर्धेच्या तालमींना वेग; दिवाळीनंतर मुंबईकरांना नाट्यप्रयोगांची मेजवानी!

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या मुंबई केंद्रावरील प्राथमिक फेरीला १६ नोव्हेंबर २०२६ पासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी सहभागी नाट्यसंस्थांच्या तालमींना जोरदार सुरुवात झाली असून कलाकारांनी तयारीला वेग दिला आहे. गिरगाव येथील साहित्य संघ मंदिर आणि माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर या दोन नाट्यगृहांमध्ये स्पर्धेतील नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. सकाळी ११.३० वाजता आणि रात्री ७.०० वाजता अशा दोन सत्रांत हे प्रयोग रंगतील. त्यामुळे दिवाळीनंतर मुंबई आणि परिसरातील नाट्यरसिकांना विविध नाट्यप्रयोगांचा आस्वाद घेता येणार आहे.

महाराष्ट्राला समृद्ध आणि वैभवशाली नाट्यपरंपरेचा वारसा लाभला आहे. या परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासह हौशी कलाकारांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा, हा राज्य नाट्यस्पर्धेच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या व्यासपीठामुळे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार आणि विविध रंगकर्मींना आपली कलाकृती सादर करण्याची संधी मिळते. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या नियोजनानुसार यंदाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

मुंबई केंद्रावरील सहभागी नाट्यसंस्थांचे कलाकार आपापल्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढून नाटकांच्या तालमी करत आहेत. संवादफेक, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा आणि रंगमंचावरील हालचाली यांचा कसून सराव सुरू आहे. प्रत्येक नाट्यसंस्था आपला प्रयोग अधिक प्रभावी व्हावा, यासाठी मेहनत घेत आहे. कलाकारही आपल्या भूमिकांमध्ये अधिकाधिक सहजता आणि प्रभाव निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

यंदाच्या स्पर्धेत सामाजिक, कौटुंबिक आणि समकालीन विषयांवरील विविध नाट्यकृती सादर होणार आहेत. या नाटकांतून हौशी रंगभूमीवरील नवनवीन संकल्पना, वैविध्यपूर्ण आशय आणि प्रयोगशील सादरीकरण अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यामुळे मुंबईतील हौशी रंगभूमीवर पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गिरगाव येथील साहित्य संघ मंदिर आणि माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे रंगणाऱ्या प्रयोगांना मुंबईसह परिसरातील नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. हौशी कलाकारांच्या कलाविष्काराला दाद देऊन त्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे. नाट्यरसिकांच्या उपस्थितीमुळे हौशी रंगकर्मींना प्रोत्साहन मिळेल आणि मुंबईतील हौशी रंगभूमीला नवे बळ मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!