खाद्यपदार्थांची विक्री बिनधास्त, तपासणी यंत्रणा सुस्त! नायगावकरांच्या आरोग्याशी खेळ
खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेसोबतच वजनातही ग्राहकांची फसवणूक; वजनमापे विभाग गाढ झोपेत?

अंकुशकुमार देगावकर
नायगाव :- नायगावात खाद्यपदार्थांच्या शुद्धतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, भेसळीच्या संशयासह कालबाह्य वस्तूंची सर्रास विक्री होत आहे. मात्र, या गंभीर प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) दुर्लक्ष असून कोणतीही प्रभावी तपासणी मोहीम हाती घेण्यात आलेली नाही.
शहरातील बाजारपेठेत खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा आणि ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. भेसळयुक्त व रासायनिक पदार्थांचा वापर करून तयार केलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीबाबत नागरिकांकडून तीव्र चिंता व्यक्त होत आहे. असे असतानाही अन्न व औषध प्रशासनाची प्रभावी तपासणी मोहीम दिसून येत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांच्या ताटात नेमके काय वाढले जात आहे, याची खातरजमा करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेने आता तरी जागे व्हावे, अशी मागणी जोर धरत आहे.
नायगाव ही तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असल्याने येथे खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री चालते. हॉटेल्स, मिठाईची दुकाने, बेकरी, डेअरी, शीतपेय केंद्रे आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता आणि साठवणुकीच्या नियमांचे पालन होते की नाही, याची नियमित तपासणी होणे अपेक्षित आहे. मात्र, उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री, अस्वच्छ परिसर, खाद्यतेलाचा वारंवार होणारा वापर तसेच कालबाह्य (Expired) वस्तूंच्या विक्रीबाबत नागरिकांकडून वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत.
विशेषतः खवा, पनीर, मिठाई, पेढे, ब्रेड आणि टोस्ट यांसारखे पदार्थ लहान मुलांसह सर्वच वयोगटातील नागरिकांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. अशा पदार्थांच्या निर्मितीत वापरले जाणारे घटक, उत्पादन व कालबाह्यता तारीख आणि साठवणुकीची पद्धत यांची तपासणी झाली नाही, तर ग्राहकांच्या आरोग्याशी गंभीर तडजोड होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे केवळ दुकानांची वरवर पाहणी न करता, प्रत्यक्ष नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वजनमापे विभागानेही झोपेचे सोंग सोडावे..!
खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबरोबरच ग्राहकांची आर्थिक लूट रोखण्याची जबाबदारी वजनमापे विभागाचीही आहे. पॅकबंद वस्तूंवरील छापील कमाल किरकोळ किंमत (MRP), निव्वळ वजन, वजनकाट्यांचे वैध मुद्रांकन आणि प्रत्यक्ष आकारले जाणारे दर यांची अचानक तपासणी होणे आवश्यक आहे. छापील किमतीपेक्षा अधिक दर आकारणे किंवा वजनात तफावत ठेवणे यांसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी विभागाने सक्रिय भूमिका बजवावी, अशी मागणी होत आहे.
मोठ्या शहरांपुरतीच तपासणी मोहीम मर्यादित न ठेवता जिल्हा, तालुका आणि ग्रामीण बाजारपेठांपर्यंत अन्न व औषध प्रशासनाने आपली यंत्रणा सक्रिय करावी. नायगाव शहरातील हॉटेल्स, स्वीट मार्ट, बेकरी, डेअरी, शीतपेय विक्री केंद्रे आणि अल्पोपहारगृहांची विशेष तपासणी करावी. खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत चाचणी करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी जागरूक ग्राहकांकडून होत आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन, संबंधित अधिकाऱ्यांना नायगावमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश द्यावेत, अशी तीव्र अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न केवळ कागदोपत्री कारवाईने सुटणार नाही, तर खाद्यपदार्थांच्या शुद्धतेची खात्री करण्यासाठी प्रशासनाने प्रत्यक्ष मैदानात उतरून कारवाई करण्याची वेळ आली आहे.



