जलजीवन’च्या योजनेवर शंभर कोटीचा खर्च : दोन वर्षापासून एकही योजना पुर्ण नाही
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : तालुक्यातील ७३ गावातील जलजीवन मिशन योजनेच्या कामावर तब्बल शंभर कोटीच्या वर जलजीवन खर्च झाला असला तरी सन २०२२ पासून आजपर्यंत एकाही पाणी पुरवठा योजनेचे काम पुर्ण झाले नाही. गुतेदार एक आणि कामे दुसरेच करत असल्याने एवढ्या महत्वाकांक्षी योजनेच्या कामांचा ग्रामीण भागात बट्ट्याबोळ झाला आहे.
नायगाव तालुक्यातील अंचोली, अंतरगाव, औराळा, बळेगाव, बरबडा, बेंद्री, बेटकबिलोली, भोपाळ, चारवाडी, दरेगाव, देगाव, धनंज, धानोरा त.मा., धुप्पा, डोंगरगाव, गडगा, घुंगराळा, गोदमगाव, गोळेगाव, हंगरगा, हिप्परगा जा., होटाळा, हुस्सा, इकळीमाळ, इकळीमोर, इज्जतगाव, कहाळा बु,कहाळा खु, कांडाळा, कार्ला त.मा., कोठाळा, केदारवडगाव, खैरगाव, खंडगाव, कोपरा, कुंचेली, कुंटूर, कुष्णूर, लालवंडी, माहेगाव, मांडणी, मनूर त.ब., मरवाळी, मोकासदरा, मुगाव, नरंगल, नावंदी, निळेगव्हाण, पळसगाव/टाकळगाव, परडवाडी, पाटोदा त.ब., पिंपळगाव, राहेर, रानसुगाव, रुई बु. रूई खु., सालेगाव, सांगवी, सातेगाव, शेळगाव छत्री, शेळगाव गौरी, सोमठाणा, सुजलेगाव, ताकबिड, टाकळी बु., टाकळी त.ब., टाकळी त.मा., तलबिड, टेंभुर्णी, वजिरगाव व वंजरवाडी अदि गावातील पाणी पुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन योजनेतून तब्बल १०३ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
योजना मंजूर झाल्यानंतर सन २०२२ व २०२३ या वर्षात कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे पण आजपर्यंत एकाही योजनेचे काम पुर्ण झालेले नाही. वास्तविक अनेक एजन्सीकडे एकापेक्षा जास्त कामे तर आहेतच काही गावात सरपंच आणि गुत्तेदारांच्या संगणमताने योजनेचे तीनतेरा वाजवण्याचे काम सुरु आहे. तर काही ठिकाणी गुत्तेदार एक आणि काम दुसरेच करत आहेत. काही गुत्तेदारांनी विहीरीचे काम एकाला, पाईपलाईनचे काम दुसऱ्याला तर जलकुंभाचे काम तिसऱ्यालाच दिले आहे.
नायगाव तालुक्यातील ७३ पाणी पुरवठा योजनेच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी एकच उपभियंता असून. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या नायगाव कार्यालयातील ६ कनिष्ठ अभियंत्याची पदे रिक्त असून एकच उप अभियंता काय करणार. त्यातच आता लोकसभेची आचारसंहिता लागल्याने उप अभियंत्याला निवडणुकीशी संबधीत बैठकांना जावे लागत असल्याने ग्रामीण भागातील जलजीवन मिशन योजनेच्या कामाचा बट्ट्याबोळ झाला आहे.
दोन वर्षानंतरही अनेक कामे २५ टक्केच्या आतच…
नायगाव तालुक्यातील तब्बल ७३ गावात जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामे सुरु असून सन २०२२ पासून कामे सुरु असताना आजपर्यंत एकही काम पुर्ण झाले नाहीत. मोकासदरा येथील योजनेचे काम ६ टक्के, टेंभुर्णी ११ टक्के, देगाव १२ टक्के, होटाळा १४ टक्के, पाटोदा १५ टक्के, निळेगव्हाण १७ टक्के, सोमठाणा १९ टक्के, तलबिड २२ टक्के, बरबडा २५ टक्के. दोन वर्षानंतरही कामाची प्रगती पाहता जलजीवनच्या योजनेतील गैरव्यवहार दिसून येतो.