ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

डी-मार्ट सुपर मार्केटमधील किटकॅट चॉकलेटमद्धे आढळली चक्क अळी

नांदेड :- चॉकलेट हे लहान मुलांचा जीव की प्राण ! चॉकलेटसाठी मुले वाटेल ते हट्ट करतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना चॉकलेट देताना खबरदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. याचे कारण म्हणजे शहरातील एका नामांकीत सुपर मार्केटमध्ये खरेदी केलेल्या नेस्ले कंपनीच्या किटकॅट चॉकलेटमध्ये अळी निघाल्यामुळे पालकांमद्धे एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार दि.16 फेब्रुवारीला घडला आहे.

या गंभीर प्रकाराची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाने सुपर मार्केटमधील नेस्ले कंपनीच्या चॉकलेटचा सर्व साठा सील केला आहे. नांदेडच्या यशोधरा नगर भागातील सुभाष दिगंबरराव भंडारे हे 16 फेब्रुवारी रोजी शहरातील लातूर फाटा भागातील डी-मार्ट या सुपर मार्केटमध्ये किराणा सामान खरेदीसाठी गेले होते.

यावेळी त्यांनी मुलांसाठी नेस्ले कंपनीचे किटकॅट चॉकलेट देखील खरेदी केले. हे चॉकलेट खाण्यासाठी त्यांनी फोडले असता त्यामध्ये चक्क जिवंत अळी निघाली. ही बाब त्यांनी सुपर मार्केटच्या व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तातडीने अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधून लेखी तक्रार केली. सुपर मार्केटमधील नेस्ले कंपनीच्या सर्व ब्रँडच्या खाद्य पदार्थांची प्रयोगशाळेत तपासणी करावी, लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कंपनीविरुद्ध तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नामांकित सुपर मार्केटमध्ये जाऊन तेथील नेस्ले कंपनीच्या सर्व चॉकलेटची तपासणी केली व हा साठा सील केला. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय चट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषिकेश मरेवाड, संतोष कनकावाड यांनी ही कारवाई केली.

सुपर मार्केटमधील नेस्ले कंपनीच्या चॉकलेटचा संपूर्ण साठा सील केला आहे. तसेच चॉकलेटचे नमुने पुणे येथील अन्न प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहेत, असे अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, चॉकलेट घेतल्यानंतर स्वतः त्याची तपासणी करूनच मुलांना खाण्यास द्यावे. तसेच असा अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी असे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीच्या या चॉकलेटमध्ये अळ्या आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच चॉकलेटच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker