ताज्या बातम्यानांदेडनायगांव

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण स्थळ सोयीनुसार निवडण्याची मुभा द्या; ‘महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना’ नांदेडची डाएट प्राचार्यांकडे मागणी

अंकुशकुमार देगांवकर

नायगाव : शिक्षकांना दिवाळीच्या सुट्ट्यांच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी सोयीचे प्रशिक्षण स्थळ निवडण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, नांदेड च्या वतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) नांदेडचे प्राचार्य यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सेवेची १२ व २४ वर्षे पूर्ण करणाऱ्या शिक्षकांसाठी दरवर्षी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजित केले जाते. मात्र, यंदा हे प्रशिक्षण दिवाळीच्या सुट्टीच्या काळात आले आहे. बहुतांश शिक्षकांची बदली त्यांच्या मूळ गावापासून १५० ते २०० किलोमीटर अंतरावरील तालुक्यांत झालेली आहे. दिवाळी सणासाठी शिक्षक व त्यांचे कुटुंबीय मूळ गावी येतात. अशा वेळी लांबच्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी उपस्थित राहताना शिक्षकांना अप-डाऊन करावे लागेल, ज्यामुळे घाईगडबडीत अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कुटुंबीय गावी गेल्याने प्रशिक्षणाच्या ठिकाणी शिक्षकांवर हॉटेलचे जेवण करण्याची वेळ येऊ शकते. या सर्व आपत्कालीन व कौटुंबिक बाबी लक्षात घेऊन शिक्षकांना त्यांच्या मागणीनुसार सोयीचे प्रशिक्षण स्थळ निवडण्याची सवलत द्यावी, असे निवेदनात नमूद केले आहे.

सुलभकांनाही अर्जित रजेचा लाभ मिळण्याची मागणी…
यासोबतच, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणात प्रशिक्षण देणाऱ्या सुलभकांना (Trainers) गेल्या काही वर्षांपासून अर्जित रजेचा (Earned Leave) लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांप्रमाणेच प्रशिक्षण देणाऱ्या सुलभकांनाही मागील वर्षांपासून व पुढील भविष्यात अर्जित रजेचा कायदेशीर लाभ मंजूर करण्यात यावा, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

या निवेदनावर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष मंगल सोनकांबळे, प्रशिक्षणार्थी दीपक वाडीकर, देविदास बालाघाटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!