ताज्या बातम्यानांदेडनायगांव

पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यालाच सायबर भामट्यांचा फटका ; दोन बँकांतून एकाच दिवशी १.७० लाखांची सायबर लूट!

प्रकाश महिपाळे

नायगाव : नायगाव पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले विस्तार अधिकारी प्रकाश जाधव यांच्या मुखेड येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि नायगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या दोन बँकांतील खात्यांमधून एकाच दिवशी (दि. २८ आक्टोबर रोजी) सायबर भामट्यांनी तब्बल १ लाख ७२ हजार ७७४ रुपयांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच ग्राहकाच्या दोन वेगवेगळ्या बँक खात्यांतून एकाच दिवशी रक्कम लांबवल्याने बँकांच्या सायबर सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

नायगाव पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले विस्तार अधिकारी प्रकाश जावव यांचे मुखेड येथील सेंट्रल बँक आँफ इंडिया व नायगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत खाते आहे. मात्र दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुखेड येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून १ लाख ४२ हजार ६९६ रुपये लंपास करण्यात आले. तर नायगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून रात्रीच्या सुमारास प्रथम २० हजार १३८ रुपये आणि त्यानंतर ४९९, १,९९८, १,९९८, ५०० व ९८९ रुपयांचे पाच संशयास्पद व्यवहार करण्यात आले. या खात्यातून एकूण ३० हजार १२२ रुपये काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कोणताही व्यवहार केला नसताना खात्यातून पैसे गायब झाल्याने प्रकाश जाधव यांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यांनी ३० ऑक्टोबर रोजी मुखेडच्या सेंट्रल बँकेत, तर ३१ ऑक्टोबर रोजी नायगावच्या स्टेट बँकेत लेखी तक्रारी दाखल केल्या. संबंधित दिवशी कोणताही आर्थिक व्यवहार, धनादेश, फोन पे, आरटीजीएस अथवा बँकेतून पैसे काढण्याची प्रक्रिया केली नसताना खात्यातून अनधिकृतरीत्या रक्कम वळती झाल्याचे त्यांनी तक्रारीत स्पष्ट केले आहे. लंपास झालेली रक्कम तातडीने परत मिळवून देण्याची मागणीही केली आहे.

बँकांच्या सुरक्षेचे नेमके चालले तरी काय?
एकाच व्यक्तीच्या दोन वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकाच दिवशी सायबर हल्ला होणे ही केवळ ग्राहकाची आर्थिक हानी नसून बँकांच्या डिजिटल सुरक्षा व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. संशयास्पद व्यवहार ओळखणारी यंत्रणा, व्यवहारांची पडताळणी, ग्राहकांना तत्काळ सूचना आणि आपत्कालीन व्यवहार रोखण्याची व्यवस्था नेमकी किती सक्षम आहे? सायबर सुरक्षा आणि ग्राहकांच्या ठेवींच्या संरक्षणाची जबाबदारी बँकांची नाही काय? ग्राहकाने कोणताही व्यवहार केला नसताना त्याच्या खात्यातून पैसे गायब होत असतील, तर डिजिटल बँकिंगच्या सुरक्षिततेबाबत विश्वास तरी कसा ठेवायचा?

आता ग्राहकाला न्याय मिळणार की बँकांच्या चकरा?
या प्रकरणात दोन्ही बँकांनी तातडीने तांत्रिक तपास करून व्यवहारांचा मागोवा घ्यावा, संबंधित रक्कम परत मिळवून द्यावी आणि जबाबदारी निश्चित करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा ग्राहकांच्या मेहनतीच्या पैशांच्या सुरक्षेबाबत बँकांची भूमिका केवळ आश्वासनांपुरतीच मर्यादित राहणार का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!