मेळगाव येथे पशुपालकांसाठी ‘वंध्यत्व निवारण व चारा साक्षरता’ शिबिर संपन्न

प्रकाश महिपाळे
नायगाव :- ग्रामपंचायत मौजे मेळगाव येथे पशुपालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे ‘जनावरांचे वंध्यत्व निवारण शिबिर’ आणि ‘चारा साक्षरता अभियान’ आज दि. ३० ऑक्टोबर रोजी पशुपालकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत संपन्न झाले. पशुवैद्यकीय दवाखाना कुंटूर अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन मेळगाव येथे करण्यात आले होते.

ज्या पशुपालकांची जनावरे वेळेत माजावर येत नाहीत किंवा वारंवार उलटतात (गाभण राहत नाहीत), अशा गायी आणि म्हशींची तज्ज्ञांमार्फत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. पशुवैद्यकीय पथकाने प्रत्यक्ष तपासणी करून जनावरांवर आवश्यक ते उपचार केले व पशुपालकांना सल्ला दिला.

या शिबिरादरम्यान उपलब्ध असणाऱ्या निकृष्ट चाऱ्यापासून सकस व पौष्टिक चारा कसा तयार करावा, याचे प्रात्यक्षिक पशुपालकांना प्रत्यक्ष दाखवण्यात आले. यामुळे कमी खर्चात जनावरांना उत्तम पोषण कसे द्यावे, याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळाले. कुंटूर पशुवैद्यकीय दवाखान्याच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भालेराव मॅडम यांनी उपस्थित राहून पशुपालकांना चारा संगोपन, जनावरांचे आरोग्य, योग्य पोषण आहार आणि आधुनिक पशुपालन पद्धतींविषयी सविस्तर व मोलाची माहिती दिली.

या शिबिराला मेळगाव येथील ग्रामस्थ आणि पशुपालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. स्थानिक पशुपालकांनी वेळेवर उपस्थित राहून शिबिराचा व प्रात्यक्षिकाचा लाभ घेतला. या उपक्रमामुळे जनावरांच्या आरोग्याबाबत आणि दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर करण्याच्या दृष्टीने मोलाची माहिती मिळाल्याबद्दल मेळगाव येथील पशुपालकांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भालेराव मॅडम आणि कुंटूर पशुवैद्यकीय दवाखान्याच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले.



