सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार ◆मयतात कुंडलवाडी येथील दोघांचा तर केरूर येथील दोघांचा समावेश
◆ नववर्षाच्या पहिल्या दिवशी कुंडलवाडी शहरावर शोककळा ◆ अक्कलकोट पोलिसांनी दिली माहिती
कुंडलवाडी :- नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी जात असलेल्या स्कार्पिओ व आईचर टेम्पोच्या झालेल्या भीषण अपघातात ४ जण ठार झाले असून मयतात कुंडलवाडी येथील दोघांचा समावेश आहे तर उर्वरित दोन मयत हे बिलोली तालुक्यातील केरूर येथील रहिवासी आहेत.हा अपघात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट ते गाणगापूर मार्गावर मैदगी गावच्या शिवारात दि.१ जानेवारी रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास घडली असल्याची माहिती अक्कलकोट पोलिसांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कुंडलवाडी येथील हणमलू पाशावार व केरूर येथील कुर्णापल्ले कुटुंब तसेच मित्रपरिवार हे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी स्कार्पिओ गाडी क्र.एम एच १४ डीए १००१ ने गेले होते.नववर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ आणि गणगापूर येथील श्री दत्तच्या मंदिरांना भेट द्यायचं ठरवलं होतं. त्यानुसार त्यांनी अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थाचं दर्शन घेतलं.
त्यानंतर ते स्कॉर्पिओ कारने गणगापूरच्या दिशेनं जात होते. दिनांक 1 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अक्कलकोट ते गाणगापूर दरम्यान मंदिर की या गावच्या शिवारात स्कार्पिओ व आईचर टेम्पो क्र. जीजे १५ एव्हि १४६६ यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे हा अपघात एवढा भीषण होता की स्कार्पियो चे जागोजागी घटनास्थळी तुकडे पडले होते.
या अपघातात कुंडलवाडी येथील हणमलू गंगाराम पाशावार( वय ३५) व व वैष्णवी उर्फ ऐश्वर्या हणमलू पाशावर (वय १४) या बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला तसेच बिलोली तालुक्यातील केरूर येथील रहिवासी गंगाधर कुर्णापल्ले व सागरबाई कुर्णापल्ले या दोघांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
या अपघातात इतर १० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी अक्कलकोट पोलीस ठाण्यात योगेश्वर करून आपले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आईचर टेम्पो चालकाविरुद्ध गुरनं ३/२०२५ भारतीय न्याय समिती नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वामी हे करीत आहेत.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर देवदर्शनासाठी गेलेल्या कुंडलवाडी येथील भाविक व केरूर येथील भाविकांवर अपघाताने काळाचा घाला घातल्याने कुंडलवाडी व केरूर येथील गावावर शोककळा पसरली आहे अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे रवाना झाले आहेत.