‘योजना रोजगार हमी, थोड तुम्ही थोड आम्ही’ ; संगणमताने शासकीय निधीवर डल्ला मारण्याचा उद्योग
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : ‘योजना रोजगार हमी, थोड तुम्ही थोड आम्ही’ असाच उद्योग नायगाव तालुक्यात सुरु आहे. पांदन रस्ते, खडीकरण, फळबाग, सार्वजनिक वृक्ष लागवड आणि शेततळे यासारख्या योजनात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, कंत्राटी तांत्रिक अधिकारी, सहायक कार्यक्रमाधिकारी आणि रोजगार सेवक यांच्या अभद्र युतीतून शासकीय निधी हडप करण्याची मोहीम मागच्या दोन वर्षापासून सुरु आहे.
मागच्या दोन वर्षापासून नायगाव तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात संगणमताने भ्रष्टाचार होत असून या भ्रष्टाचाराला पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या संगणमताने शासकीय निधी हडप करण्याचा उद्योग सुरु आहे. सहायक कार्यक्रम अधिकारी, कामावर देखरेख ठेवणारे कंत्राटी अभियंता, यांच्यासह ग्रामसेवक या रोहयोच्या भ्रष्टाचार सहभागी असल्याचे दिसून येते.
नायगाव तालुक्यात मागच्या दोन वर्षापासून मातोश्री पांदन रस्ते, मुख्यमंत्री पांदन व शिव पांदन रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. अकुशल काम हे मजूरामार्फत करण्याऐवजी थेट जेसीबीच्या सहाय्याने करुन बोगस मजूर दाखवण्यात आले. पंचायत समितीच्या स्तरावरही दाखल करण्यात आलेल्या बोगस मस्टरची तपासणी न करताच संबधीतांना बिले अदा करण्यात आलेली असून आजही करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आलेल्या पांदन रस्त्यावरील खडीकरणाच्या कामातही भ्रष्टाचार सुरुच आहे. गायगोठे, सार्वजनिक वृक्ष लागवड, फळबाग, फुल शेती, शेततळे, सिंचन विहीर, शेळी गोठे अदि कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे.
पंचायत समितीवर प्रशासक राज असल्याने गटविकास अधिकाऱ्यासह रोहयोच्या कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देणारे अधिकारी, सहायक कार्यक्रम अधिकारी, कंत्राटी अभियंता, ग्रामसेवक व रोजगार सेवक या सर्वांच्या संगणमताने रोहयोच्या कामात भ्रष्टाचार सुरु आहे.
तालुक्यातील काही पांदन रस्त्याबाबत तक्रारी आल्या होत्या त्या तक्रारीची आम्ही चौकशी केली असता चौकशी सत्यता आढळून आल्यामुळे ती कामे थांबवली आहेत. नवीन कामांना मंजुरी देणेही थांबवले आहेत. विशेष म्हणजे अनेक लाभार्थी मंजूर घेवून दोन दोन वर्षे कामे सुरु केली नाहीत अशांची मंजुरी रद्द केली आहे. त्याचबरोबर नवीन कामांना मंजुरी देतांना आता वेळेत कामे पुर्ण करण्याचा बाँड घेत आहोत बाँड दिल्याशिवाय मंजुरी देण्यात येत नाही.
एल.आर. वाजे, गटविकास अधिकारी, नायगाव