महसूलच्या पथकाने मुरुमाचे अवैध उत्खनन करतांना जेसीबी पकडला

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : तालुक्यातील गोदमगाव येथे जेसीबीच्या सहायाने मुरुमाचे अवैध उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन मंडळ अधिकारी सौ. रेखा राठोड यांच्या पथकाने काल दि. १८ रोजी सायंकाळी जेसीबी पकडला आहे. पुढील कारवाईसाठी पकडलेला जेसीबी नायगाव पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे.
नायगाव तालुक्यात मागच्या काही महिण्यापासून माफीयांनी मुरुमाचे अवैध उत्खनन करुन थेट महसूल विभागालाच आव्हान दिले होते. महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून दिवसरात्र मुरुमाचे अवैध उत्खनन करुन त्याची बेकायदेशीर वाहतूक होत होती. मात्र अधिकारी या गंभीर प्रकाराकडे अर्थपुर्ण दुर्लक्ष करत होते. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यत गेली. मागच्या दोन तीन महिण्यापासून मुरुमाचे अवैध उत्खनन करुन शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवण्यात येत असताना अधिकारी बघ्याची भुमिका घेत होते पण गोदमगाव येथील कारवाई मात्र नाईलाजास्तव करावी लागली असल्याचे महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी बोलून दाखवत आहेत.
नायगाव तालुक्यातील गोदमगाव शिवारात जेसीबीच्या सहाय्याने मुरुमाचे उत्खनन करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार धम्मप्रीया गायकवाड यांना दि. १८ रोजी दुपारी मिळाली. गायकवाड यांनी सदरची माहिती मंडळ अधिकारी रेखा राठोड यांना सांगितली व तातडीने कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
त्यानंतर रेखा राठोड या मांजरम व कोलंबीच्या तलाठ्यांना सोबत घेवून गोदमगाव शिवारात गेल्या असता जेसीबीच्या सहायाने मुरुमाचे उत्खनन करण्यात येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सदरची जेसीबी जप्त करुन ताब्यात घेण्यात आली व रात्री उशिरा पुढील कारवाईसाठी नायगाव पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहे.