ट्रव्हल्स कंटेनरच्या अपघातात २० जखमी : पाच गंभीर
मन्मथस्वामींच्या दर्शनाला निघाले होते ४० भक्त
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : तिर्थयात्रेला निघालेल्या भाविकांच्या ट्रव्हल्सने रविवारी (ता.२२) रोजी सायंकाळी कंटेनरला धडक दिली. यात २० भाविक जखमी झाले असून ४ जन गंभीर असल्याची माहिती ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. घटनेची माहिती समजताच आ. राजेश पवार यांनी रुग्णालयात भेट देवून जखमींना तातडीने नांदेडला हलविले. अपघाग्रस्त ट्रव्हल्समध्ये ४० प्रवासी होते.
मागच्या काही महिण्यापासून आ. राजेश पवार यांनी मतदारसंघातील मतदारांना तिर्थयात्रा घडवून आणत आहेत. रविवारी (ता.२२) रोजी सायंकाळी ४० महिला व पुरुष एम एच १२ एफ सी ९०१७ या ट्रव्हल्समधून मन्मथस्वामीच्या दर्शनाला निघाले होते. पण कुंचेली येथून निघालेली ट्रव्हल्स डिझेल भरण्यासाठी नरसी नायगाव दरम्यानच्या एका पेट्रोल पंपावर गेली. बाहेर येतांना निष्काळजीपणा दाखवल्याने महामार्गावरुन जाणाऱ्या एका कंटेनरला धडकला. या धडकेत ट्रव्हल्समध्ये खिडकीला बसलेली एक चिमुकली बाहेर पडली.
झालेल्या या अपघातात तुकाराम संतराम इबितवार (२५), पांडुरंग नागोराव इबितवार (२८), सानवी विश्वनाथ लालवंडे (७), विश्वनाथ अशोक लालवंडे (२८), महानंदाबाई शिवराज भुरे (४०), लक्ष्मीबाई भुरे (५०), दत्ता लालवंडे (६२), राजेंद्र संभाजी होनराव (५६), रमेश निळकंठ टोंपे, हावगीरराव पिडकोरे (६२), स्वाती विश्वनाथ लालवंडे (२७), अंजनाबाई पिंडकोरे, हनमंत लालवंडे ( ३५), पार्वतीबाई शिवशाम भुरे (४५), बसवदे गोविंद (६०),दिव्या लालवंडे (१२), इंदरबाई संभाजी लालवंडे (८०), सुमनबाई डाकोरे (६०), शंकर काशीनाथ भुरे (६०) अदिसह अन्य एक असे २० प्रवासी भक्त जखमी झाले.
या सर्व जखमींना आजुबाजूच्या नागरिकांनी तातडीने नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघाताच्या घटनेची माहिती समजताच आ.राजेश पवार, शिवराज पा. होटाळकर, श्रीनिवास चव्हाण, श्रावण पाटील भिलवंडे, देविदास बोमनाळे, बाबासाहेब हंबर्डे, माधव कल्याण, गंगाधर कल्याण यांनी रुग्णालयात धाव घेवून सर्व जखमींना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे.
जखमीपैकी तुकाराम संतराम इबितवार, स्वाती विश्वनाथ लालवंडे, अंजनाबाई पिंडकोरे, हनमंत लालवंडे व इंदरबाई लालवंडे यांना गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकांऱ्यांनी दिली.