नरसी सोसायटीवर अखेर प्रशासक : प्रशासकीय अध्यक्ष म्हणून गजानन भिलवंडे यांची नियुक्ती

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : निवडणुकीनंतर राजकीय वाद, शहकाटशहाचे राजकारण आणि कोर्टकचेरीमुळे जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या नरसी सोसायटीवर अखेर दि. ४ जुलै रोजी प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. अशासकीय सदस्यांच्या प्रशासकीय मंडळात आपल्याच समर्थकांची वर्णी लावून भाजप नेते श्रावण भिलवंडे यांनी विरोधकांना जोरदार धक्का देत आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यात यश मिळवले आहे.
स्थानिक नेत्यांनी नरसी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे अतिशय चुरशीची व अटीतटीची झाली. पंचवार्षिक निवडणुकीत १३ पैकी ७ सदस्य संभाजी भिलवंडे, भास्कर भिलवंडे, रवींद्र भिलवंडे व माणिक लोहगावे यांच्या गावकरी पँनलचे निवडून आल्याने त्यांना काठावरचे बहूमत मिळाले होते तर दुसरीकडे ६ सदस्य भाजप नेते श्रावण यांच्या आपल पँनलचे निवडूण आले. निवडणुकीनंतरच नरसी सोसायटीच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. दोन्ही गटांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली त्यामुळे नरसी सोसायटीचे पारडे कधी इकडे तर कधी तिकडे झुकत राहीले. त्यातच दि. ५ जुन रोजी नरसी सोसायटीच्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया पार पडणार होती. मात्र एक दिवस अगोदर बहूमत असलेल्या गटाच्या एका सदस्याचे निधन झाल्याने मोठा पेचप्रसंग निर्माण झाला.
त्यामुळे दि.५ जुन रोजी बहूमत नसल्याने सभा रद्द करण्यात आली त्यानंतर पुन्हा एकदा नवनिर्वाचित सदस्यांची सभा बोलवण्यात आली पण संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या कोरमभावी निवडी होवू शकल्या नाहीत. दोन वेळा बोलावण्यात आलेल्या सभेला कोरम पुर्ण होवू शकला नाही. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी नरसी सेवा सहकारी सोसायटीवर प्रशासकीय समिती नियुक्त करण्याचे निर्देशित दिले. त्यानुसार दि. ४ जुलै रोजी नायगावचे सहायक निबंधक जी.आर.कौरवार यांनी तीन सदस्यांच्या प्रशासकीय समिती नियुक्तीचे आदेश काढले असून यात सोसायटीच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष गजानन पांडुरंग भिलवंडे, तर सदस्य म्हणून शंकर विश्वनाथ कोकणे व वसंत शरणप्पा कस्तूरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नरसी सोसायटीच्या हायहोल्टेज निवडणुकीचा वाद सुरुच असताना भाजप नेते श्रावण भिलवंडे यांनी विरोधकांना मात देत थेट प्रशासकीय मंडळ नियुक्त करुन सोसायटी आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश मिळवले असल्याने याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.