वाळू माफीयांना महसूल विभागाचा पुन्हा दणका : दोन सक्शन पंपासह तराफा जप्त

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : माफीयांनी बोटीऐवजी तराफ्यावर सक्शनपंप ठेवून वाळूचा अवैध उपसा करण्याचा फंडा सुरु केला होता. मात्र नायगावच्या तहसीलदारांनी गुरुवारी पहाटे धाडसी कारवाई करत बरबडा वाडी परिसरातील गोदावरी नदी पात्रातून वाळू उपशाची यंत्रणा जप्त करुन पुन्हा एकदा दणका दिला आहे.
नांदेड जिल्ह्यातील लोहा, मुदखेड व उमरी तहसीलदारांनी वाळू माफीयांना खुली सुट दिली असल्याने त्यांना भागातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रातील वाळू आता शिल्लक राहीली नाही. कुठल्याच वाळू घाटाचा लिलाव झालेला नसतात माफीयांनी अवैध उपसा करुन वाळू शिल्लक ठेवली नाही. त्या भागात वाळू नसल्याने वाळू माफीयांनी आपला मोर्चा नायगाव तालुक्याकडे वळवला आहे. मागच्या काही दिवसांपासून वाळू व मुरुम माफीयांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे बिलोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यासाठी तीन नायब तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली पथके गठीत केली होती. नायगाव तालुक्यातील नदीपात्राच्या परिसरात गस्त घालण्याच्या सुचना दिल्या होत्या तरीही बरबडा वाडी परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा सुरुच होता.
बरबडा वाडी परिसरात वाळूचा उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार सौ. धम्मप्रीया गायकवाड यांना मिळाली. त्यांनी कारवाई करण्यासाठी नांदेडवरुन एक बोट मागवली व नायब तहसीलदार सतीश कुलकर्णी, मंडळ अधिकारी काळे, आरू, कावळे तलाठी हसनपल्ले, शाम मुंडे, कारलेकर, चालक तुकाराम पुरी यांना सोबत घेवून गुरुवारी पहाटे बरबडा वाडी परिसरातील गोदावरी नदीपात्रात उतरून कारवाई केली. यात तराफ्यावर दोन सक्शनपंप ठेवून वाळूचा अवैध उपसा करण्यात येत असलेली यंत्रणा पकडली त्यानंतर कुंटूर पोलीसांना बोलावण्यात आले. तहसीलदारांचे पथक बोटीतून आल्यानंतर वाळू उपसा करणाऱ्या मजूरांनी नदीपात्रात उड्या मारुन पलायन केले.
अवैध वाळू उपसा करणारी पकडलेली यंत्रणा बोटीच्या सहाय्याने किणाऱ्यावर आणण्यात आली असून तराफे नष्ट करुन सक्शनपंप जप्त करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
आजपर्यंत जेवढ्या अवैध वाळू उपसा प्रकरणाच्या कारवाया झाल्या त्यात यंत्रणा सापडते ती जप्त करण्यात येते किंवा नष्ट करण्यात येते पण वाळू उपसा कोण करतोय त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही याचे मात्र आश्चर्य वाटते.