होटाळकरांच्या सहविचार सभेत कार्यकर्ते आ.राजेश पवार विरोधात आक्रमक
कमिशनखोर उपाधीसह केले अनेक गंभीर आरोप

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नायगाव येथे भाजपच्या (ता.२२) रोजी झालेल्या सह विचार सभेत मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आ. राजेश पवार यांच्या विरोधात अतिशय आक्रमक व टोकाची भाषा वापरली, अनेक गंभीर आरोप केले, असल्या आमदारामुळे पक्षाची प्रचंड बदनामी होत आहे. त्यामुळे शिवराज पाटील होटाळकरांनी तिसऱ्या आघाडीची उमेदवारी घ्यावी किंवा अपक्ष मैदानात उतरावे असा आग्रह धरला. मात्र होटाळकरांनी पक्षाने उमेदवारी न दिल्यास जनतेच्या दरबारात न्याय मागणार असल्याची संयमी भुमिका घेतली असली तरी ते बंडखोरीच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
मागील काही महिण्यापासून भाजपचे जिल्हा सरचिटणीस असलेले शिवराज पाटील होटाळकर यांनी रविवारी (ता.२२) रोजी नायगाव येथे सह विचार सभा आयोजित करुन नायगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्याचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी व्यासपीठावर विनायकराव पाटील शिंदे, साहेबराव पवार, गंगाजी पाटील मुगावकर, संभाजी पा. शिंदे,गजानन श्रीरामवार, पांडुरंग शिंदे, गंगाधर गायकवाड, राजेश आनेराये, प्रा.अशोक पवार, गुलाब पा. सोमठाणकर अदिंची उपस्थिती होती.
महेश देशपांडे यांनी प्रास्ताविक करतांना आ. राजेश पवार यांचा नामोल्लेख करुन बोचऱ्या शब्दात टिका केली. त्यानंतर मनोगत व्यक्त करतांना श्रीपत पाटील शिंदे, शिवानंद अप्पा मठपती, पांडुरंग शिंदे, गंगाजी पा. मुगावकर, दतात्र्यय कावडे यासह अनेकांनी आ.राजेश पवार यांच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त केला. गरजेच्या वेळी फोन केल्यास आमदार राजेश पवार कधीच फोन घेत नाहीत, घेतला तरी उद्धट व अरेरावीची भाषा वापरतात, काही विचारल्यास शिविगाळ करण्याबरोबरच खोटे गुन्हे नोदवून कार्यकर्त्यांना ठाण्याची हवा दाखवतात, यांना पैशाची मस्ती आली आहे, भ्रष्ट व कमिशनखोर आमदार असल्याचाही आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी अतिशय खालच्या पातळीवरुन टिका केल्याने त्यांच्याबद्दल मतदारसंघात व कार्यकर्त्यात प्रचंड रोष असल्याचे दिसून आला.
आमदारावर टिकेची दोड उठवताना अनेकांनी आता शिवराज पाटील होटाळकरांनी विधानसभेच्या आखाड्यात उतरले पाहीजे असा आग्रह धरला. आ. पवार यांच्याबद्दल प्रचंड नाराजी असल्याने भाजपने होटाळकरांना उमेदवारी दिली पाहीजे. एवढ्या उपरही पक्षाने उमेदवारी न दिल्यास मनोगत व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांनी तिसऱ्या आघाडीचा आणि अपक्ष निवडणूक लढवण्याचा होटाळकरांना पर्याय दिला.
उपस्थित कार्यकर्त्यांनी कुठल्याही परिस्थितीत विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यासाठी आग्रह केल्याने शिवराज होटाळकरांनी आपल्या भाषणातून पुन्हा आ. राजेश पवार यांच्या कार्यशैलीचा जोरदार समाचार घेतला. उमेदवारी बाबत बोलतांना मी पक्षाकडे उमेदवारीसाठी आग्रह धरणार असून पक्षाने माझा विचार न केल्यास जनतेच्या दरबारात न्याय मागण्यासाठी येणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी खंबीरपणे पाठीशी उभे रहावे असे आवाहन केले. होटाळकरांनी उमेदवारी बाबत अतिशय संयमी भुमिका घेतली असली तरी ते बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिसत आहेत.
बच्चेवार व भिलवंडे यांचा सतत अपमान… प्रस्थापितांचा विरोध झुगारून नायगाव तालुक्यात भाजपची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी बालाजी बच्चेवार व श्रावण पाटील भिलवंडे यांनी मोठा संघर्ष केला. त्यांच्यामुळेच भाजप आज नावारुपाला आला पण आ. राजेश पवार हे बच्चेवार व भिलवंडे यांच्या सारख्या जुन्या नेत्यांना संपवण्याचे काम करत आहेत असा आरोप यावेळी काहींनी केला.