कुंडलवाडी शहरातील बाजारपेठ मराठा समाजाकडून बंद तर ओबीसी समाजाकडून चालू

कुंडलवाडी :- मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी १७ सप्टेंबर पासून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज दि.२३ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती.त्यानुसार कुंडलवाडी शहरात मराठा समाजाकडून बंद बाबत आवाहन करण्यात आले होते.आज दि.२३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता बसस्थानक येथून मराठा समाज बांधवांनी एकत्रित येत शिवाजी चौकातून मुख्य बाजारपेठेकडे जात बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन केले.
यानंतर त्यांच्या पाठोपाठच ओबीसी आरक्षण बचावासाठी ओबीसी समाज बांधवही प्रा. लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषण सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाज बांधवही एकत्रित येत बाजारपेठ बंद करू नका असे आवाहन केल्याने कुंडलवाडी शहरातील बाजारपेठ अवघ्या दहा च मिनिटात सुरू होऊन व्यवहार सुरळीत झाले.
मराठा समाज बांधव व्यापारपेठ बंद करा असे आवाहन करत पुढे तर ओबीसी समाज बांधव त्या पाठीमागे येऊन व्यापारपेठ बंद करू नका असे आवाहन केले. अखेर कुंडलवाडी शहरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद न ठेवता चालू ठेवले. एकंदरीतच मराठा समाजाने आरक्षणासाठी पुकारलेल्या कुंडलवाडी बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिले नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मराठा समाज बांधव पुढे व ओबीसी समाज बांधव पाठीमागे अशी परिस्थिती असतानाही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी हि परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली. या पार्श्वभूमीवर शहरात मुख्य रस्त्यावर व ठिकठिकाणी पोलीस व गृहरक्षक दलाचे जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.