दरेगाव येथे “जलदीपाची दीपावली”; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते उद्घाटन
जलदिंडी, जलसंस्कृती साक्षरता शिबिर व श्रमदानाचे आयोजन

नायगाव : – “गावातील पाणी गावात, शेतातील पाणी शेतात” हा संदेश घेऊन दरेगाव (ता. नायगाव खै., जि. नांदेड) येथे “जलदीपाची दीपावली” हा जलसंवर्धनाचा उपक्रम सुरू होत आहे. त्याचा प्रारंभ सोहळा बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता हनुमान मंदिर प्रांगणात होणार आहे. त्याआधी सकाळी १० वाजता गावातून जलदिंडी काढण्यात येणार आहे. दि. ४ व ५ नोव्हेंबर असे दोन दिवस जलसंस्कृती साक्षरता शिबिर व श्रमदान होणार आहे.
सोहळ्याचे उद्घाटन नांदेडचे जिल्हाधिकारी मा. राहुल कर्डिले यांच्या हस्ते होणार आहे. नांदेड वनविभागाच्या उपवनसंरक्षक मा. श्रीमती मनिषा पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तहसीलदार मा. धम्मप्रिया गायकवाड, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक मा. एस. पी. राठोड आणि पंचायत समिती नायगावचे गटविकास अधिकारी मा. प्रवीण वानखडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
पोलीस निरीक्षक मा. महेश माळी, तालुका कृषी अधिकारी मा. दीपेश देवरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी मा. राहुल शिवशेट्टे, सहायक गटविकास अधिकारी मा. ऋषिकेश पाटील, विस्तार अधिकारी मा. प्रकाश जाधव, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता मा. मारोती बोडके, ग्रामपंचायत दरेगावचे प्रशासक मा. महेश मुखेडकर आणि ग्रामसेवक मा. श्रीमती संगीता बी. गुट्टे बोंडले हेही प्रमुख उपस्थितीत असतील. जलनायक मा. बाबुराव बस्वदे वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
“प्रशासन आपल्या दारी” या भावनेतून शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ एकत्र येऊन पावसाचे पाणी अडवणे, जिरवणे आणि जलस्रोत जपणे यासाठी श्रमदान करणार आहेत. “आर्थिक दान नको; समयदान आणि श्रमदानातून जलदीप लावू या!” असे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले आहे. गेली २९ वर्षे “ज्ञानदीपाची दीपावली” हा उपक्रम राबविणारे समुपदेशक व व्यक्तिमत्त्वविकासतज्ज्ञ प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे या उपक्रमाचे संकल्पक व आयोजक आहेत. दरेगावचे ग्रामस्थ श्रमसहकार्य करत आहेत. परिसरातील नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून श्रमदानात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सहभागासाठी ९७६७७०४६०४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
.



