ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई ; १,५२८ किलो संशयित भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

प्रयोगशाळेचा अभाव व गंभीर त्रुटींमुळे आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित

नांदेड : अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या नांदेड परिमंडळ-२ पथकाने नुकतीच एम.आय.डी.सी. खानापूर, ता. देगलूर येथे कारवाई केली. या कारवाईत भेसळीचा संशय असलेले ३ लाख ५ हजार ६८० रुपये किमतीचे १ हजार ५२८ किलो रिफाइंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आले. तसेच आस्थापनेत स्वतःची प्रयोगशाळा नसल्यासह इतर गंभीर त्रुटी आढळल्याने संबंधित आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.
एम.आय.डी.सी. खानापूर येथील मे. उमेश अग्रो इंडस्ट्रीज या आस्थापनेची तपासणी करण्यात आली.

यावेळी अन्न व्यावसायिक रमाकांत दिगांबर पद्मवार यांच्या आस्थापनेतून ‘वारुणी गोल्ड’ या ब्रँडचे १ हजार ५२८ किलो रिफाइंड सोयाबीन तेल भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आले. जप्त तेलाची अंदाजित किंमत ३ लाख ५ हजार ६८० रुपये आहे. तपासणीदरम्यान आस्थापनेत स्वतःची प्रयोगशाळा नसल्याचे तसेच अन्य गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे प्रशासनाने संबंधित आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित केला आहे.

ही कारवाई छत्रपती संभाजीनगर विभागाचे सह आयुक्त (अन्न) एस. आर. करकाळे यांच्या निर्देशानुसार आणि नांदेड परिमंडळ-२चे सहायक आयुक्त (अन्न) आर. एम. भरकड यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. एस. लोंढे यांनी केली. नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत अन्नपदार्थांची तपासणी करून आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. अन्नसुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!