ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

दुष्काळात पशुधनासाठी चारा उपलब्धतेसाठी कृषी अवशेषांचा 50 टक्के साठा राखून ठेवा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

पशुधनासाठी चारा उपलब्धतेला प्राधान्य ; युरिया-मोलॅसिस प्रक्रियेद्वारे चाऱ्याचे पोषणमूल्य वाढविणारचारा व्यवस्थापनासाठी उद्योजकांना सहकार्याचे आवाहन…

नांदेड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध व्हावा, यासाठी कृषी अवशेषांचा योग्य वापर करून चारा निर्मितीला प्राधान्य द्यावे. उपलब्ध कृषी अवशेषांच्या साठ्यापैकी 50 टक्के साठा जनावरांसाठी चारा प्रक्रिया करण्याकरिता उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज सायंकाळी कृष्णूर औद्योगिक क्षेत्रातील अभिजित बायोकोल इंडस्ट्रीज आणि गोदावरी प्लायवूड पार्टिकल इंडस्ट्री या उद्योगांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

यावेळी त्यांनी उद्योजकांशी चर्चा करून कृषी अवशेषांचा वापर, उपलब्ध साठा आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याअंतर्गत पिकांचे अवशेष, सोयाबीन कुटार आणि उसाचा चोथा पशुखाद्यासाठी उपलब्ध व्हावा, यासाठी वाहतूक व विक्रीसंदर्भात आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या आदेशांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी औद्योगिक प्रकल्पांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.

बायोकोल निर्मिती तसेच अन्य औद्योगिक प्रक्रियांसाठी वापरल्या जाणाऱ्या कृषी अवशेषांपैकी उपलब्ध साठ्याचा काही भाग पशुधनासाठी चारा निर्मितीकरिता राखून ठेवण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळाच्या काळात पशुधनाला चारा उपलब्ध होणे आवश्यक असल्याने संबंधित उद्योगांनी प्रशासनाच्या उपाययोजनांना सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. सोयाबीन कुटार आणि उसाच्या चोथ्यावर योग्य पद्धतीने युरिया-मोलॅसिस प्रक्रिया केल्यास त्यांचे पोषणमूल्य वाढविण्यास मदत होते. त्यामुळे चारा टंचाईच्या काळात अशा प्रक्रियायुक्त कृषी अवशेषांचा पर्यायी पशुखाद्य म्हणून उपयोग करता येतो. उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करून चारा निर्मिती वाढविणे आणि पशुधनाचे पोषण सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी अधोरेखित केले.

जिल्ह्यातील सर्व बायोकोल उद्योगचालक आणि शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या कामात जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. कृषी अवशेषांचा योग्य वापर करून चारा टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. या पाहणीवेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, नायगाव तालुका पशुचिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. गौतम खिल्लारे, बरबडा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक देवकत्ते आणि कृष्णूर येथील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी शिवप्रसाद तेनलवार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!