बिलोलीच्या जन्म-मृत्यू नोंदी अडकल्या ऑनलाइन प्रक्रियेत; आरोग्य विभागाकडे धाव
नगरसेविका अनुपमा गायकवाड यांचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन; प्रलंबित नोंदींची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी

New Bharat Times नेटवर्क
बिलोली : बिलोली नगरपरिषद हद्दीतील जन्म-मृत्यू नोंदींची ऑनलाइन प्रक्रिया रखडल्याने नागरिकांना प्रमाणपत्रे मिळविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगरपरिषदेकडून ऑनलाइन प्रणालीद्वारे नोंदी पाठवूनही संबंधित आरोग्य विभागाकडून मंजुरी मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी आहेत. हा प्रश्न तातडीने मार्गी लावून प्रलंबित नोंदींची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी नगरसेविका सौ. अनुपमा महेंद्र गायकवाड यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगरपरिषदेकडून ऑनलाइन नोंदी पाठविल्यानंतरही मंजुरी मिळत नसल्याने नागरिकांची विविध महत्त्वाची कामे रखडली आहेत. ऑनलाइन प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळेही काही नोंदी प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रमाणपत्रांच्या कामासाठी नागरिकांना वारंवार नांदेड येथे जाऊन विचारपूस करावी लागत असल्याने त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम खर्च होत आहेत.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामांवर परिणाम…
जन्म प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश, कागदपत्रांची पूर्तता आणि इतर शैक्षणिक कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, मृत्यूच्या नोंदी ऑनलाइन उपलब्ध होत नसल्यास संबंधित कुटुंबीयांना मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी येतात. परिणामी वारस नोंद, मालमत्ता हस्तांतरण, पेन्शन, विमा दावे आणि इतर शासकीय व कायदेशीर प्रक्रिया रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रलंबित नोंदी तातडीने पूर्ण करण्याची मागणी…
बिलोली नगरपरिषद हद्दीतील जुन्या व नवीन सर्व प्रलंबित जन्म-मृत्यू नोंदींची तपासणी करून ऑनलाइन प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या नोंदींवर नियमानुसार कार्यवाही करावी आणि तांत्रिक अडचणींचे कायमस्वरूपी निराकरण करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच प्रलंबित नोंदींची संख्या व सद्यस्थितीचा आढावा घेऊन संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना निश्चित कालमर्यादा द्यावी. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामांसाठी तसेच वारस नोंद व मालमत्ता हस्तांतरणासाठी तातडीने प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या प्रकरणांना प्राधान्य द्यावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नागरिकांना प्रमाणपत्रांसाठी वारंवार नांदेड येथे जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी बिलोली नगरपरिषद आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाने समन्वय साधून प्रक्रिया सुरळीत करावी. तसेच या प्रकरणात केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगरसेविका अनुपमा महेंद्र गायकवाड यांनी केली आहे.



