धर्माबाद येथे १ लाख ८५ हजार रुपयांचा संशयित भेसळयुक्त अन्नसाठा जप्त
मिरची पावडर व खाण्याच्या मिठाचा १,६१६ किलो साठा अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत ताब्यात

नांदेड : अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन, नांदेड-२च्या पथकाने दि. २३ ऑक्टोबर रोजी धर्माबाद येथे कारवाई करून कमी दर्जाचा व भेसळयुक्त असल्याचा संशय असलेला एकूण १ लाख ८५ हजार २६४ रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त केला.
धर्माबाद येथील मेसर्स किसान इंडस्ट्रीजचे विक्रेते सय्यद मकबूल सय्यद हुसेन यांच्या आस्थापनाची तपासणी करण्यात आली. यावेळी ८९८ किलो खुली मिरची पावडर, किंमत १ लाख ७९ हजार ५२० रुपये, तसेच ७१८ किलो खाण्याचे मीठ, किंमत ५ हजार ७४४ रुपये, असा एकूण १ हजार ६१६ किलो अन्नसाठा ताब्यात घेण्यात आला.
सदर अन्नपदार्थ कमी दर्जाचे (Substandard) तसेच भेसळयुक्त असल्याचा संशय असल्याने त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी ए. एम. तम्मडवार, व्ही. एस. लोंढे आणि श्रीमती एस. व्ही. श्रीरामे यांच्या पथकाने केली. छत्रपती संभाजीनगर विभागाचे सह आयुक्त एस. आर. करकाळे आणि नांदेड-२चे सहाय्यक आयुक्त आर. एम. भरकड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.vनागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून अशा प्रकारच्या तपासण्या व कारवाया यापुढेही सुरू राहणार आहेत.


