ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत ‘JAYBHIM GEN-Z’ संवाद

विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ; दिपक गजभारे यांचे आवाहन

नांदेड : नव्या पिढीशी संवाद साधण्यासाठी सुजातदादा आंबेडकर नांदेड येथे येत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘JAYBHIM GEN-Z’ या विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, गुरु गोविंदसिंहजी स्टेडियम परिसर, नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवाद साधणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

आजच्या बदलत्या काळात विद्यार्थ्यांसमोर शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय आणि समान संधी यांसारखे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. या प्रश्नांवर खुलेपणाने चर्चा करणे, युवकांमध्ये वैचारिक जागरूकता निर्माण करणे आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांशी नव्या पिढीला जोडणे, या दृष्टीने हा संवाद कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा मार्ग दाखविला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करणे आणि युवकांचा सामाजिक कार्यातील सहभाग वाढविणे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.

नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक-युवती तसेच परिवर्तनवादी विचारांच्या नागरिकांनी ‘JAYBHIM GEN-Z’ संवाद कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेड (दक्षिण) जिल्हा उपाध्यक्ष दिपक माधवराव गजभारे घुंगराळेकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!