ताज्या बातम्यानांदेडनायगांव

सोयाबीन खरेदीतील २ किलो कट्टीच्या प्रश्नावर बालाजी बच्चेवार आक्रमक

शेतकऱ्यांची लूट थांबवून योग्य वजनपद्धती लागू करा ; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीत योग्य वजनाचा लाभ मिळावा आणि कथित दोन किलो कट्टीच्या प्रकाराला आळा घालण्यात यावा, अशी मागणी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी जिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीन खरेदीसाठी एकसमान व पारदर्शक वजनपद्धती लागू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

यंदा दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने सोयाबीनचे पीक घेतले आहे. मात्र, बाजार समित्या आणि खासगी व्यापाऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करताना वजनाच्या पद्धतीबाबत शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. पोत्याच्या भरतीच्या नावाखाली अतिरिक्त सोयाबीन घेतले जात असल्यास त्याची तातडीने तपासणी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे बच्चेवार यांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदनानुसार, बारदान्यासह ५० किलो ८०० ग्रॅम वजनाची पद्धत लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष खरेदीत ५२ किलो किंवा त्यापेक्षा अधिक वजन करून दोन किलो कट्टी लावली जात असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकारामुळे प्रत्येक पोत्यामागे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असून, मोठ्या प्रमाणावरील खरेदीत हा आर्थिक फटका अधिक गंभीर ठरू शकतो.

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांमार्फत जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना लेखी निर्देश द्यावेत. नियमबाह्य कट्टी आकारली जाणार नाही, याची खात्री करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापारी व आडतदारांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी बच्चेवार यांनी केली आहे. याशिवाय प्रत्येक बाजार समितीत वजनपद्धतीविषयी माहिती देणारे फलक लावावेत, शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी हेल्पलाइन सुरू करावी आणि जूट बारदान्यातील खरेदीसाठी संपूर्ण जिल्ह्यात एकसमान पद्धत लागू करावी, असेही त्यांनी सुचविले आहे.

शेतकऱ्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळावा, वजनात पारदर्शकता राहावी आणि खरेदी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य कार्यवाही करावी, अशी अपेक्षा बालाजी बच्चेवार यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!