बेपत्ता तरुणाचा खुन, दोन महिण्यानंतर खुनाची घटना उघड : पाच आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : तालुक्यातील बरबडा येथील जमीलखान पठाण हा तरुण दोन महिण्यापासून गायब होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने बरबडा येथील पाच संशयितांना काल गुरुवारी ताब्यात घेवून पोलीसी खाक्या दाखवताच खुन केल्याचे कबूल केले. या प्रकरणी शुक्रवारी सायंकाळी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
दोन महिण्यापुर्वी म्हणजे दि.२ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ११.३० वाजता बरबडा येथून मी बाहेर जावून येतो असे सांगून जमीलखान शादूलखान पठाण हा मोटारसायकलवर बाहेर गेला होता तेव्हापासून तो गायबच होता. त्यामुळे घरच्यांना घातपाताचा संशय आला होता तरीही कुंटूर पोलिसांनी फक्त मिसिंग दाखल करुन घेतली. कुंटूर पोलीस या प्रकरणी कुठलाच तपास करण्यात यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे सदरचे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी सोनवणे हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले व जमीलखान पठाणच्या भावाकडून संशयिताची माहिती मिळवली.
माहिती मिळताच गुरुवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या टिम ने प्रथमेश पांपटवार, पवन प्रभाकर माचनाड, माधव राठोड, गोविंद शंकर रेडेवाड व चक्रधर शिंदे पाच संशयीतांना ताब्यात घेतले. नांदेडला नेवून त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच यांनी खुन केल्याचे कबूल केले. माचनाड हा अवैध रेतीचे उत्खनन करुन चोरट्या मार्गाने विक्री करतो तर रेडेवाड हा अवैध दारु विक्रीचा व्यवसाय करतो. तसेच माधव राठोड हा जुगार अड्डे चालवतो. या सर्व़ाची माहिती जमीलखान पठाण हा पोलिसांना देत असल्याचा संशय होता. त्यामुळे त्या सर्वाचा जमीलवर राग होता. या रागातून त्याला संपवण्याचा कट रचण्यात आला असल्याचे जोरदार चर्चा बरबडा येथे होत आहे.
नियोजनबद्ध कट रचून दि. २ नोव्हेंबर रोजी जमील पठाणला रात्रीला पार्टी करण्यासाठी बोलावून घेण्यात आले. गोदावरी नदी पात्रांच्या जवळील एका शेतात नेवून अगोदर त्याचा गळा दाबून खुन केला व त्याच मोटारसायकलला ताराने बांधून गोदावरी नदीत फेकून देण्यात आले. या प्रकरणी वरील पाच आरोपींच्या विरोधात कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आला असून. या खुनाच्या प्रकरणात वरील पाच आरोपीसह अन्य काहींचा सहभाग असावा अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेची यंत्रणा याचाही कसून तपास लावेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
कुंटरचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांनी या प्रकरणात गांभीर्य दाखवले तर नाहीच तपासाच्या बाबतीतही उदासीनता दाखवली. या प्रकरणी वरिष्ठाकडून कान उघडणी केली आणि येत्या दोन तीन दिवसात त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
जमीलखान पठाण याचे प्रेत गोदावरी नदी पात्रात टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले. ते काढण्यासाठी टिमही बोलावण्यात आली होती. पण कारवाई होण्यास वेळ लागल्याने शुक्रवारी शोध मोहीम राबवण्यात आली नाही.