ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांसोबत उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी साजरी केली दिवाळी

शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत सायाळमध्ये रंगला मायेचा दीपोत्सव!

नांदेड : राज्यातील शेतकऱ्यांनी सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत खचून जाऊ नये, कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. पुढील दहा महिन्यांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, टँकर, आनंदाचा शिधा यांसह आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत आहे, अशी ग्वाही राज्याचे उद्योग, गुंतवणूक, सेवा व मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज दिली.

नांदेड तालुक्यातील सायाळ येथे शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी करताना ते बोलत होते. यावेळी हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके-बोंढारकर, आमदार बाबूराव कदम-कोहळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, तहसीलदार संजय वारकड यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

डॉ. सामंत म्हणाले की, आतापर्यंत 50 दिवाळी साजऱ्या केल्या; मात्र 51 वी दिवाळी सायाळ येथील शेतकरी आणि ग्रामस्थांसोबत साजरी करताना विशेष समाधान मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांसोबत बसून संवाद साधण्याचा आनंद वेगळाच आहे. अशा संवादातून नवी ऊर्जा मिळते. यावर्षी शासनातील सर्व मंत्री शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करीत आहेत. पुढील वर्षापासूनही गावागावांत जाऊन नागरिकांसोबत दिवाळी साजरी करण्याचा मानस आहे.

शेतकऱ्यांसोबत केवळ दिवाळी साजरी करून थांबणार नसून त्यांच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून समन्वयाने काम केले जाईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम सुरू राहील. तसेच मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी त्यांच्या शिक्षणाचे शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या जीवनात कायमस्वरूपी आनंद निर्माण व्हावा आणि त्यासाठी निसर्गाचीही साथ मिळावी, अशी प्रार्थना करून त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील यांनी धरणातील पाण्याचे शेतकऱ्यांना समान वाटप करणे, पाणी साठवणुकीसाठी प्रत्येक नाल्यावर छोटे बंधारे उभारणे, पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या विविध अडचणी सोडविणे याकडे लक्ष वेधले. गावागावांतील समस्या जाणून घेऊन विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

आमदार बालाजी कल्याणकर यांनी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन केले. आमदार आनंद तिडके-बोंढारकर यांनी शेतकऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून पाच हजार रुपयांची मदत देण्यात आल्याचा उल्लेख करून उर्वरित मदतही तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली.

विधवा महिलेच्या कुटुंबीयांसोबत फराळ…
या कार्यक्रमात उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांसोबत दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. तसेच सायाळ येथील पाच मुलींसह राहणाऱ्या विधवा महिला मुक्ताबाई केशव धुमाळे यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांसोबत फराळ केला. कुटुंबाचा आधार नसलेल्या या महिलेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी पिण्याचे पाणी, वीज, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, निराधार योजना आदींबाबतच्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन तत्पर असल्याचे सांगत त्यांनी चिंता न करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्या हस्ते गावातील पिण्याच्या पाण्याच्या टँकरचा शुभारंभ करण्यात आला.

वाडी बु. उपजिल्हा रुग्णालयाची डॉ. उदय सामंत यांनी केली पाहणी…
सायाळ येथील कार्यक्रमानंतर परतीच्या प्रवासात उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी वाडी बु. येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन तेथील आरोग्यविषयक सोयी-सुविधांची पाहणी केली व माहिती घेतली. तसेच सुसज्ज व अत्याधुनिक सुविधाचे रुग्णालय उभारल्यामुळे समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!